Menu

Wednesday, June 8, 2022

कोकण पर्यटन ..देवाक काळजी ?

 

२४  मे २०२२ च्या सकाळी तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावरून वीस पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन गेलेली बोट परत येताना समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच अचानक उलटली आणि यात दोन  पर्यटकांचा मृत्यू झाला ! ही घटना झाली तेव्हा आमचा दहा पर्यटकांचा गट, तेथून जवळच असणाऱ्या देवबागच्या बीचवर रहाण्यास आलेलो होतो. आपली सुट्टी आनंदाने घालविण्यासाठी आलेल्या कुटुंबावर हा अकल्पित आघात झाल्याचे समजताच  अत्यंत वाईट वाटले.   आमच्या देवबाग , सिंधुदुर्ग  या  तीन दिवसांच्या सहलीत  आम्ही या भागातील समुद्र पर्यटन जितके आकर्षक आणि पर्यटकांना  सुखावणारे आहे तितकेच धोकादायकही  कसे आहे याचा अमुभव घेतला.

 

देवबाग खरोखर देवाची बाग शोभावी अशी  अप्रतिम, नैसर्गिक सौंदर्याने नटलेली जागा आहे. करली नदी आणि अरबी सागरचा संगम इथे होतो. २०१४ च्या त्सुनामी संकटानंतर ही जागा उदयास आलेली आहे. त्याचीच  साक्ष  देणारे  त्सुनामी  बेट, समुद्रात दिमाखात उभे आहे. या बेटावर नारळीच्या हिरव्यागार बागा हाळीने उभ्या दिसतात



तसेच सर्व पर्यटकांच्या आवडीचे वॉटर स्पोर्ट्सही  याच बेटासमोर होतात. पण आपण नेहमी बघतो तसे, हे वॉटर स्पोर्ट्सचे ठिकाण किनाऱ्या लगतचे नाही. इथे वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठीचे स्टॉल्स संगमाच्या पाण्यातच उभे आहेत. तिथंपर्यंत पोहोचायला बोटीनेच जावे लागते ! आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणाऱ्या नावाड्याने जरी आम्हाला बोटीत बसतांना लाईफ जॅकेट्स घालायला दिले तरी वॉटर स्पोर्ट्सच्या स्टॉल्स वर पोहोचल्यावर, ते लगेच काढा आणि मग तुम्ही ज्या बोटीने स्पोर्ट्स करणार तिथून नवीन जॅकेट्स घ्या अशी सूचना केली. हे स्टॉल पाण्यात ज्या ठिकाणी होते, त्या कमरेइतक्या पाण्यात निदान लहान मुलांनी तरी जॅकेट्स काढणे म्हणजे धोकादायकच होते . कारण या संगमाच्या ठिकाणी भरतीच्या लाटांचा जोर चांगलाच होता.  त्याला पुढचे गिऱ्हाईक लवकर मिळावे म्हणून तो निष्काळजीपणाने ही   सूचना आणि घाई करत होता. एकंदरीत त्याचा अट्टाहास आणि बऱ्याच स्टॉलवरचा असाच प्रकार  बघता आम्ही कुठलाही वॉटर स्पोर्ट्स करण्याचा निर्णय घेतला आणि बोटीतूनच करली नदीतील  सफर करून रिसॉर्टवर परतलो.


दुसऱ्या दिवशी, मोठे ऐतिहासिक महत्व आणि प्रसिद्धी लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सफरीतही असाच अनुभव  आला. किनाऱ्यावरील धक्क्यावर किल्ला बघण्यासाठी तिकीट काढले. मात्र किल्ल्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या बोटींमध्ये लाईफ जॅकेट्सची वाणवा तर होतीच शिवाय बोटीत  किती जणांना बसवावे यावरही काहीही नियम नव्हते. बोटीच्या दोन नावाड्यांमध्ये  "जास्त पर्यटक बसवले आहेत" यावरून वादावादी होत होती. ते नावाडी, पर्यटकांनी  लाईफ जॅकेट्स घालावेत यासाठी अजिबात आग्रही नव्हते. उलट "तुम्हाला भिती   वाटत असेल तरच घाला" असे सांगत होते. समुद्र तर चांगलाच खवळलेला होता आणि सर्व बोटी प्रचंड हेलकावे खात जात-येत  होत्या. आम्ही लाईफ जॅकेट्स घालून सुरक्षितरित्या जरी ही सफर करून आलो, तरी अशा सुप्रसिद्ध ठिकाणी इतका निष्काळजीपणा पाहून वाईट वाटले. प्रशस्थ आणि विचारपूर्वक बांधणी केलेल्या सिंधदुर्गाच्या प्रसन्न करणाऱ्या रपेटीने मात्र मनावरील मळभ दूर केले.  नंतर मालवणमधील रॉक्स गार्डनला भेट द्यायला गेलो. तेथून दिसणारा सुर्यास्त अप्रतिम होता. मात्र तिथल्याही खोल,खडकाळ  बीचवर कोणीही सुरक्षा रक्षक आढळला  नाही. बरेच लोक उधाणलेल्या लाटांबरोबर सेल्फी, फोटोग्राफ घेतांना आपल्या जीवाशी खेळत होते.

 


एकुणच तिथल्या भागातील समुद्र पर्यटनाच्या बाबतीत प्रशासन उदासीन दिसले.  आम्ही मात्र  योग्य ती  काळजी घेऊन  आमची सहल धमाल केली !! देवबागच्या स्वच्छ किनाऱ्यावर समुद्रात खेळण्याची भरपूर धमाल,  करली नदीच्या  नारळी पोफळीच्या काठांवरून केलेली रपेट,  सिंधुदर्गाच्या पार्श्वभूमीवर पाहिलेले देखणे सुर्यास्त,  ऐन मे महिन्यातल्या देवगड-रत्नागिरी  हापूसवर मारलेला आडवा हात , भरपूर नारळाचे दूध घालून केलेल्या मालवणी सोलकढीचा जिभेवर रेंगाळलेला आस्वाद , काजू फळाच्या  अप्रतिम चवीच्या  बोन्दू सरबताचे  रिचवलेले  पेले आणि एकमेकांच्या सोबत सततच्या हास्यकल्लोळातील घालविलेले क्षण यांनी देवबाग-मालवण-सिंधुदुर्ग अशी ही सफर आनंदात पार पडली. फक्त इतक्या सुंदर जागी ,पर्यटकांच्या सुरक्षेच्या बाबतीतली उदासीनतेने, मनाला रुखरुख लावली !        

 


No comments:

Post a Comment