Menu

Showing posts with label अर्थ साक्षरता. Show all posts
Showing posts with label अर्थ साक्षरता. Show all posts

Wednesday, November 16, 2022

तरतूद इमर्जन्सी फंड / आपत्कालीन पुंजीची…

 

तरतूद इमर्जन्सी / आपत्कालीन पुंजीची…


 इमर्जन्सी / आपत्कालीन परिस्थिती कधीही दत्त म्ह्णून समोर उभी ठाकू शकते. मग ती  परिस्थिती पूर, भूकंप.सुनामी, मृत्यु सारखी नैसर्गिक संकटे असू देत किंवा चोरी.आग लागणे.लूटमार, आजारपण.अपघात असू देतअशावेळी  मानसिक, शारिरीक तसेच आर्थिक बाबींवर होणारी ओढाताण इतकी तणावग्रस्त परिस्थिती उभी करते की  त्याची कल्पनाही केलेली बरीअशावेळी घरात किंवा भोवताली असणारे मनुष्यबळ, त्या क्षेत्रातील तात्काळ मिळणारे विश्वासाहार्य कौश्यल्य (उदा. डॉक्टर्स, वकील) , सुविधा आणि व्यवस्थेची  (उदा. ऍम्ब्युलन्स किंवा सरकारी खातीवेळेवर असणारी उपलब्धता  इत्यादी घटाकांबरोबरच आपत्कालीन  परिस्थितीसाठी केलेली पैशांची तरदूत ही अत्यंत महत्वाची ठरते. बरेचजण 'मला काही होत नाही' च्या भ्रमात अशा इमर्जन्सी फ़ंडासाठी नियोजन करत नाहीत आणि मग वेळेवर होणारा मनस्ताप, धावपळ आणि पैशासंबधीत येणारे कटू अनुभव यांचा सामना त्यांना करावा लागतो. हे सर्व टाळता येऊ शकते का? एक उदाहरण बघुयात !  ही आमच्या परिचितांसोबत झालेली  सत्यघटना आहे.

"नमस्कार मी चित्रा ! माझासोबत घडलेली ही घटना साधारणतः 30 वर्षांपूर्वीची आहे.त्यावेळी माझे यजमान, नोकरीच्या निमित्ताने  इंडोनेशियाला कार्यरत होते.मी स्वतः कल्याण.टेलीफोनमध्ये नोकरीस होते. मोठा मुलगा पाच वर्षांचा व लहान काही महिन्यांचाच होता.घरात एक नणंद बाळंतपणासाठी आलेली होती तर दूसरी कॉलेजात जात होती.माझे सासरे निवृत्त झाले होते आणि सासूबाई गृहिणीं होत्या. येथे मुद्दामच सदस्यांचे सविस्तर वर्णन केले आहे जेणेकरून आमच्या सात सदस्यीय, आबालवुद्धांचा वावर असणाऱ्या घरातील त्यावेळेची कर्ती, जबाबदार मीच होते हे लक्षात यावे. साहजिकच कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी मी वाहत होते. 

एके दिवशी अचानक सासूबाईंची प्रकृती बिघडली.त्यांना हृदयाचा त्रास सुरु झाला आणि त्यांना ताबडतोब के. . एम. हॉस्पिटलमध्ये मध्ये नेण्यात आले. तिथे गेल्यागेल्या  लगेचच  डिपॉझिटची मागणी झाली तसेच  सहा बाटल्या रक्त ताबडतोब जमा करा असे सांगितले गेले. अंदाजे खर्चाचा आकडा पाहिल्यावर डोळ्यासमोर काजवे चमकले !! डोक्यात विचार सुरु झाले, आपण तात्काळ एवढे पैसे कोठून आणणार? कल्याणला ऑफिसमध्ये जाऊन  ऍडव्हान्स पगार घ्यायलासुद्धा  वेळ नव्हता. आमच्याकडील संपत्तीची ठेवयोजनेत केलेली गुंतवणूक मोडणे किंवा नातेवाईकांकडून जाऊन पैसे जमा करणे एवढाच पर्याय माझ्याकडे शिल्लक होता. पण त्यासाठीदेखील बँकेत जाणे किंवा वेळ साधता यावी म्हणून नातेवाईकांकडे धाव घेणे क्रमप्राप्त होते. सासूबाईंची  बिघडणारी परिस्थिती  आणि धावपळ करण्यासाठी असणारी मी एकटी हे पाहता, माझा खूपच गोधळ उडाला. वृद्ध सासरे, गरोदर नणंद आणि लांब अंतरावर कॉलेजात असणारी नणंद यांची काही मदत घेता येणे शक्य नव्हते !! शेवटी हॉस्पिटलमध्येच उभ्या दिसलेल्या परिचितांकडे साऊबाईंना ताब्यात देऊन मलाच बाहेर जाऊन  पैसे उभे करावे लागले ज्यात महत्वाचा दीड तास मोडला. नशिबाने साऊबाईंवर नंतर लगेच उपचार सुरु झाले !! "

 

मला ही परिस्थिती समजल्यावर ती टाळण्यासाठी काय करता येऊ शकले असते असा विचार आला आणि तोच तुमच्यासमोर मांडते आहे. अशी तणावग्रस्त परिस्थिती टाळण्यासाठी आपण पुढीलपैकी काही उपाययोजना करू शकतो का याचा विचार करूयात !

) इमर्जन्सी / आपत्कालीन फ़ंड या  तरतुदीचा   विसरता आपल्या आर्थिक नियोजनात समावेश केला पाहिजे. त्यासाठी सोप्या  बचत / गुंतवणुकीचे माध्यम निवडावे.

) आपल्या कमीत कमी पुढील सहा महिन्यांच वेतन इमर्जन्सी / आपत्कालीन फ़ंड म्हणून योजावे.  तसेच ते  अशा ठिकाणी असले पाहिजे जिथून आपल्याला मानसिक, शारिरीक धावपळ टाळून ते लगेच हातात पाडता येईल.

) त्यासाठी लागणारी कागदपत्रे जसे पासबुक/ ATM कार्ड यांची माहिती  घरातील सर्वाना हवी.

) घरातील कर्त्याच्या आपत्कालात घरचे पूर्ण  उत्पन्न बंद होऊ शकते. त्यामुळे घरातील सर्व कमवित्या व्यक्तींचा योग्य असा (उत्पनांच्या अनुरूप) अपघाती विमा ( Accident Insurance) आणि आरोग्य विमा    (Mediclaim / Health Insurance) असणे आवश्यक आहे. याद्वारे हॉस्पिटलचा खर्च , ऍडमिट कालावधीतील उत्पन्नाची हानी यांच्यासाठी विमा मिळतो.

) कर्त्याच्या  मृत्यू सारख्या दुर्दैवी घटनेत,  त्याचा योग्य प्रमाणात असणारा जीवन विमा  (Life Insurance) कुटुंबाचे आर्थिक पडझड कमी करू शकतो. असा विमा  वेळेवर उतरवावा आणि उत्पन्ना अनुरूप  वाढवावा.  

) घराचे आर्थिक चित्र  ( जसे मिळकती, विमा, बचत तसेच गुंतवणुकी, इतर उत्पन्ने, कर्जे, टॅक्स, इतर आर्थिक दायित्वे . ) कुटुंबियांना सुस्पष्ट असणे खूप महत्वाचे आहे. त्यांना योग्य माहिती नसल्यास, कष्टार्जित पुंजी बेनामी म्हणून पडून राहू शकते किंवा गैरमार्गाने लाटली जाऊ शकते. म्हणून घराचा आर्थिक लेखाजोखा तयार करावा आणि तो वेळोवेळी अद्ययावत करावा. त्यासंबंधी घरातील व्यक्तींना साक्षर करावे. यामुळे घरातील प्रत्येकालाच  अर्थभान ही येते. 

) घरातील सर्व सदस्यांसाठी असणारे सल्लागार ( उदा.डॉक्टर्स, वकील, आर्थिक तसेच विमा सल्लागार .) यांची संपर्क माहिती  जसे पत्ते, फोन नंबर घरातील सर्वाना ठावूक हवेत.        

      अशा काही तरतुदी केल्यास, काही सवयी लावल्यास, कुटुंबियांनाही आर्थिक निर्णय घ्याव्या लागणाऱ्या बाबतीत सामायिक करून घेतल्यास, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यास आपण सक्षम होऊ शकतो.    

- लेखिका: सौ. रत्ना दिपक कुलकर्णी,

शब्दांकन सहाय्य्य :डॉरुपाली कुलकर्णी 

 

 

 

Friday, November 19, 2021

SWS अर्थवाणी - चरण ४: आर्थिक नियोजन (Financial Planning )

 


SWS अर्थवाणी - चरण ४: आर्थिक नियोजन  (Financial Planning ) 

स्वप्ने सर्वच बघतो आपण,
स्वतःसाठी अन कटुंबासाठीपण,
ती प्रत्यक्षात आणण्यासाठी,
अर्थ नियोजन असावे गाठी  ।। १ ।।

महत्वपुर्ण टप्पे जीवनातील,
जन्म, संगोपन अन शिक्षणातील,
विवाह आणि स्वप्नातले घर,
स्वप्ने ही तर अनमोल खरोखर ।। २ ।।

करावया अशी स्वप्ने साकार,
असावा आर्थिक सल्लागार,
जाणतो जो कुटुंबास बेहत्तर,
आणि मदत करण्या असे तत्पर ।।३।।

वित्तीय माहिती आणि गणिते,
सांगावी न राखिता गुपिते,
कार्य निवृत्ती आणि आर्थिक दायित्वे,
सरल होती सल्लागाराच्या मते ।। ४ ।।

अनुभव, ज्ञान आणि कार्य तत्परता,
गुणी अर्थ-सल्लागार असा नेमता,
तुमच्या ध्येयांप्रति जो घेई दक्षता,
इच्छापूर्ती होतील बघता बघता ।। ५ ।।

नियोजन होई जितक्या लवकर,
चक्रवाढी परिणाम मिळे सत्वर,  
ध्येयांप्रति जर तुम्ही जागरूक खरोखर,
तर अर्थ नियोजन करावे तत्पर  ।। ६ ।।

स्वप्ने सत्यात उतरविण्या जीवनी,
द्यावे लक्ष अर्थ नियोजनी,
सर्वांसाठी होवो कल्याणी,  
अशी ही SWS अर्थवाणी  !! 

- डॉ. रुपाली कुलकर्णी,

  ट्रेनिंग हेड,

  SWS  



Thursday, November 11, 2021

SWS अर्थवाणी - चरण ३: ब्लु-बुक (Blue Book ) 📘

 


 SWS अर्थवाणी - चरण ३: ब्लु-बुक (Blue Book ) 📘


अल्पारंभाने घेतले हाती,

अर्थ साक्षरता अभियान 👩‍🏫,

त्याद्वारे हे आवाहन,

जनहितार्थ जारी 😇 ।। १ ।। 


ज्यांच्यासाठी करिता आपण,

सदैव कष्टाने अर्थार्जन 💰,

ते आपले कुटुंबीय, प्रियजन,

यांनाही द्यावे अर्थज्ञान  ।। २।।


कुटुंबाचे आर्थिक चित्र 📈,

जे दावितसे अचुक ✅,

ते वापरावे ब्लु-बुक 📘

पहिली जबाबदारी  ।। ३ ।।


अशा सर्व आर्थिक घडामोडी,

ज्या वसविती कौटुंबिक वित्तीय घडी,       

त्यांची माहिती घरात देण्याची गोडी,

लावावी सत्वर 😇 ।। ४ ।। 


ब्लु बुक मध्ये नोंदवावी हातोहातीं,

पोस्टल आणि बचत खाती,

गुंतवणूक आणि शेअर्सची माहिती,

प्रियजनांसाठी 👨‍👩‍👦‍👦  ।। ५ ।।


विमा जो अपघाती,आरोग्य अन जीवन,

स्थावर मालमत्ता आणि कर्जाऊ दिलेले धन,

लॉकर्स आणि येणारे इतर उत्पन्न 💰,

ब्लु-बुक द्वारे जाणती प्रियजन ।। ६ ।।


कर्जे, देणगी आणि आयकर 📉,

संबंधित कागदपत्रे तसेच सल्लागार,

यासंबंधी असावेत साक्षर, 

तुमचे कुटुंबीय 👨‍👩‍👦‍👦।। ७ ।।


कर्मचारी लाभ आणि वित्तीय सुविधा,

नोंदवा ब्लु-बुकमध्ये विना दुविधा ✅,

ईच्छापत्र नोंदीद्वारे टाळा संभाव्य आर्थिक बाधा,

कुटुंबियांसाठी  ☺️।। ८ ।।


जीवन आपुले असे क्षणभंगुर,

तेव्हा करावे कुटुंबियांस अर्थ साक्षर,

अल्पारंभाने केला हाच विचार 😎 ,

अर्थ साक्षरता अभियानाद्वारे ।। ९ ।।


ब्लु-बुक निर्मिले ह्याच हेतुसाठी ,

त्याचा लाभ घ्यावा कुटुंबियांसाठी,

आर्थिक सल्ला हा देण्यासाठी,

ही SWS अर्थवाणी 😇।। १० ।।


- डॉ. रुपाली कुलकर्णी,

  ट्रेनिंग हेड,

  SWS  

Tuesday, June 1, 2021

गरज ..कौटुंबिक अर्थ साक्षरतेची !!

 


गरज ..कौटुंबिक अर्थ साक्षरतेची !!

कोविडच्या या दुसऱ्या त्सुनामीत अनेक कुटुंबांमध्ये  घरातील कर्ता  किंवा कुटुंबातील मिळकत असणारा व्यक्ती  यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या कठिण कालावधीत त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी जेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष किंवा फोनवर संवाद साधला तेव्हा असे लक्षात आले की परिवारातील इतर सदस्यांना, मृत झालेल्या व्यक्तीच्या नावे असणाऱ्या मालमत्ते विषयी, त्याने केलेल्या आर्थिक व्यवहारांविषयी  फारच जुजबी माहिती होती. त्याचाच परिणाम म्हणुन, मिळवित्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्य आर्थिकदृष्टया हतबल झालेले दिसले !

पण अशा आजूबाजूला घडणाऱ्या अनेक प्रसंगांमुळे, आपल्या कुटुंबियांना वेळीच अर्थ साक्षर करणेसाठीचे, घरातील आर्थिक निर्णयांबद्दल, व्यवहारांबद्दल त्यांना माहिती देण्याचे महत्व उद्धृत झालेले आहे ! या कालावधीत  त्यांना मानसिक आधार देण्या व्यतिरिक्त ज्या काही व्यावहारिक गोष्टी करणे  क्रमप्राप्त  होते ते करतांना अशा समदुःखी  इतर परिवारांसाठीही उपयुक्त ठरेल अशी चेकलिस्ट बनविता येईल का असा विचार केला आणि पुढीलप्रमाणे काही मुद्दे तयार केले.  ज्यांच्या घरामध्ये कुटुंबातील सदस्याचा मृत्यू ओढवलेला आहे, त्यांनी पुढील काही बाबी तपासून  पाहाव्यात आणि इतरांनी त्याबाबतीत वेळीच सजग व्हावे !

जीवन तसेच आरोग्य वीमा:  सर्वप्रथम दिवंगत सदस्याचा जीवन विमा काढलेला आहे का हे पहा . जीवन विमा एक किंवा अधिक संस्थांमध्ये काढलेला असू शकतो ही  शक्यता तपासून पहा. काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा तसेच जीवन विमा काढलेला असतो.  त्याद्वारे सुद्धा  कुटुंबियांना लाभ मिळू शकतो.  तसेच या सदस्याच्या बँक अकाउंट मधून  पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा  हप्ता  जर  वर्ग  झाला असेल  तर त्या योजने अंतर्गतही रुपये दोन लाख इतका लाभ कुटुंबियांना मिळू शकतो.  दिवंगत सदस्याचा मृत्यू जर उपचार घेताना इस्पितळात झालेला असेल तर आरोग्य विमा लाभ देखील उपलब्ध होऊ शकतो.  तेव्हा सदस्याच्या जीवन तसेच आरोग्य विमा पॉलीसी  पडताळून पहा. याबाबतीत योग्य वेळेत मृत्यूचा दाखला आणि लागू असल्यास इस्पितळाची सर्व  बिले सादर करावी लागतात.

कर्मचारी सुविधा:  दिवंगत व्यक्ती कार्यरत असणाऱ्या कंपनीमध्ये भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, बोनस, पेन्शन,  गेल्या महिन्याचा  पगार, जमलेल्या रजांचा पगार, ग्रुप वीमा, सोसायटी लाभ असे  अन्य काही लाभ कंपनी देत असल्यास ते पडताळून पहा.  त्यासाठी आवश्यक असणार्या कागदपत्रांची पूर्तता करा.   

बँक खाते अथवा मुदत ठेवी: दिवंगत सदस्याच्या नावाने किती ठिकाणी बँक/ मुदत ठेव  खाती होती आणि त्याची  कागदपत्रे जसे पासबुक, चेकबुक, बँकेची स्टेटमेंट तपासून पहा.  संबंधित बँकांमध्ये जाऊन मृत्यूचा दाखला तसेच नामांकन असणाऱ्या व्यक्तीचे इतर कागदपत्रे सादर करा. अशा व्यक्तीचा मोबाईल तपासून पाहिल्यास एस. एम. एस. द्वारे आलेले बँकेचे स्टेटमेंट किंवा मोबाईल मध्ये असणारे बँक ॲप्लिकेशन याद्वारेही माहिती प्राप्त करून घेता येऊ शकते.

इतर गुंतवणूक:  दिवंगत व्यक्तीच्या नावाने म्युच्युअल फंड, शेअर्स, पोस्टातील, खाती स्थावर मालमत्ता इत्यादी ठिकाणी गुंतवणूक असल्यास त्या संबंधित कागदपत्रे तपासून पाहता येतील.  परिवाराशी संबंधित अर्थ सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंटंट आपल्याला पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक कागदपत्रे/ स्टेटमेंट्स काढून  देऊ शकतात. अशा व्यक्तीच्या नावे जर कुठे लॉकर सुविधा घेतलेली  असेल तर तेथेही बचत अथवा गुंतवणुकीचा ऐवज किंवा कागदपत्रे ठेवलेली असू शकतात याचीही नोंद घ्या.

खर्च/ दायित्वे: दिवंगत सदस्यांच्या नावे काही कर्ज घेतलेले असल्यास त्याचे हप्ते कुठल्या बँक खात्यांमधून  वर्ग होत आहेत  हे तपासून घ्या. बँक खात्यांमधून वेगवेगळे हप्ते जसे गृहकर्ज, वाहनकर्ज,  विमा हफ्ते , म्युच्युअल फंडातील एस.आय.पी. इत्यादी वर्ग होऊ शकतात. त्याची वेळेवर दखल घ्या. दिवंगत सदस्य जर प्राप्तीकर भरत असेल तर प्राप्तिकराची  कागदपत्रे तपासून पहा.  काही ठिकाणी टी.डी.एस. वर्ग केलेला असू शकतो त्याविषयी  माहिती जाणून घ्या.

कोरोना कालावधीत ओढवलेल्या या  परिस्थितीत, 'अर्थ साक्षर परिवार ' असणे, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे इच्छापत्र असणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते आहे. घरातील प्रत्येक मिळवित्या सदस्याने, कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या सर्व आर्थिक बाबींचे  नोंदनीकरण करणे, घरातील सर्व सदस्यांना केलेल्या आर्थिक व्यवहारांविषयी तसेच तरतुदींविषयी माहिती देणे आणि त्यायोगे त्यांना अर्थ साक्षर करणे गरजेचे आहे . असे केल्याने एखाद्या कुटुंबाची वास्तविक, आर्थिक परिस्थिती आणि त्यायोगे असणारी आपली जबाबदारी याचे भान  सर्व सदस्यांना  स्पष्ट होण्यास मदत होते. कोरोना कालावधीत आजुबाजुला घडणारे  प्रसंग डोळसपणे पाहुयात आणि  आपल्या कुटुंबियांना आपल्या घरातील आर्थिक घडमोडींची पूर्ण माहिती, देऊयात.

तुमच्या आणि परिवाराच्या आरोग्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा !! भवतु सब्ब मंगलम् !!

Tuesday, May 18, 2021

SWS अर्थवाणी - चरण २: आयुर्विमा (Insurance)



SWS अर्थवाणी - चरण २: आयुर्विमा (Insurance)

जो वाही उत्पन्नाचा भार , त्याने करावा आयुर्विमा  स्वीकार,

जीवनांती जो बने आधार, कुटुंबियास ll १  ll‍

 

जैसी उत्पन्नाची सीमा,त्यायोगे घ्यावा विमा,

आर्थिक आघात करावा  धीमा, या मार्गे ll २  ll

 

दायित्वे वाढता जीवनात, वाढ करावी संरक्षणात,

अतिरिक्त लाभ प्राप्तीकरात,नियोजने  ll ३ ll

 

भरावा हफ्ता वेळेवार,टाळावा संभाव्य अधिभार,

नेमता सुयोग्य सल्लागार, चिंता मिटे ll ४  ll

 

विमा असेल घेतलेला, किंवा संस्थेमार्फत मिळालेला,

सांगावा तो कुटुंबाला, वेळेवरती ll ५ ll

 

करिता विमा कवच धारण, अर्थसंकटा न जीवन शरण,

चिंतेचे मिटते कारण,  नियोजने  ll l ६ ll

 

अशी थोर ही विमा करणी, मनः शांती देते जीवनी,

होवो सर्वांसाठी कल्याणी, SWS अर्थवाणी II ७ II    


SWS अर्थवाणी - चरण १: मालमत्ता नियोजन (Estate Panning)

 


SWS अर्थवाणी - चरण १: मालमत्ता नियोजन (Estate Panning)

चरण १: मालमत्ता नियोजन (Estate Panning)


होता जीवनाचा आरंभ, निश्चित होतसे  अंत,

करावा तो सुखांत, विवेकबुद्धे II १  II  


धनसंपदा, गृह ,भूप्रदेश, विभागून द्यावा विना क्लेश,

वाद-विवाद ना उरो शेष, नियोजने II २  II


सुवर्णलंकार, हिरे-मोती, व्यावसायिक असोत मिळकती,

वाटप व्हावे ही सुमती, वाद  टाळण्या  II ३ II   


असावे असे नियोजन, उपभोग घेतील प्रियजन,

व्हावे समाजासाठी ही दान, यथाशक्ती  II ४ II


लिहावे सुस्पष्ट इच्छापत्र, संभ्रम नसावा त्यात काडीमात्र,

साक्षी असावेत यात इष्टमित्र, कायद्याने II ५  II     


वाटता क्लिष्टता फार, नेमावा योग्य सल्लागार,  

नियोजना जो देई आकार, तुमच्या इच्छे II ६  II 


अशा मालमत्ता नियोजनी, आश्वस्थ व्हावे जीवनी,  

होवो सर्वांसाठी कल्याणी SWS अर्थवाणी II ६ II 

 

    - -- रुपाली 


तिचे अर्थभान ...



तिचे अर्थभान ...

तिच्या अर्थभानावर बोलण्याआधी, आपल्या आजुबाजूला घडणारे 'अर्था'शी  निगडीत काही प्रसंग आधी पाहुयात. समजा,  श्री.  चिंतामणी आपल्या कुटुंबासाठी काही आर्थिक गुंतवणूक करतात किंवा करणार आहेत. अशावेळी घरातील सौ.चिंतामणींशी ते कसे संवाद साधतात ते पाहुयात. 

प्रसंग १:  शून्य  संवाद ! सौ.चिंतामणींना आपल्या आर्थिक गुंतवणूकीविषयी  घरात माहिती देण्यास अजिबात आवडत नाही किंवा तसे करण्याची त्यांना आवश्यकताही वाटत नाही.  

प्रसंग २:  श्री. चिंतामणी आपल्या आर्थिक गुंतवणूकीविषयी  केवळ इन्फॉर्मेशन म्हणून घरात शेअर बोलतात. त्यामागील उद्देश  काय  आहे  किंवा  इतर माहितीची चर्चा ते घरात करत नाहीत.  सौ.चिंतामणींनाही  त्याबाबतीत  कळत नसल्याने त्यांनाही अशी माहिती ऐकण्यात रस वाटत नाही.  त्यांची प्रतिक्रिया 'हं' यापलीकडे जात नाही.

प्रसंग ३. : श्री.  चिंतामणी आपल्या  आर्थिक गुंतवणूकीविषयी  घरात उत्साहाने  सांगतात. त्यावर  सौ. चिंतामणी  सर्व माहिती ऐकून तर घेतात पण  'मला कशाला हवी ही सगळी माहिती ? तुम्ही बघताय ना सगळं व्यवस्थित ? ठीक तर मग!' अशी अंगकाढू प्रतिक्रिया देतात.   

प्रसंग ४: श्री. चिंतामणी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी  सौ.चिंतामणींबरोबर  सल्लामसलत करतात. आणि त्यांचेही मत ग्राह्य धरतात.

घरातील आर्थिक निर्णय असू देत नाहीतर चर्चा, आपल्या आजूबाजूला घडणारे हे आणि इतर अनेक 'अर्थ'पूर्ण असे प्रसंग पाहिल्यानंतर हे खचितच मनात येते की 'घरातील स्त्रियांची, कुटुंबासंबंधित घेतल्या जाणाऱ्या आर्थिक निर्णयांबाबत/ नियोजनामध्ये  नक्की  काय भूमिका असते ? आधुनिक जगातील स्त्री वर्गाला पुरेसे अर्थभान आहे का?' घरातील स्त्री, मग ती स्वतंत्रपणे कमाविती असू देत किंवा नाही, तिचे घरातील आर्थिक निर्णयांबाबतचे मत अगदीच मोजक्याच घरांमध्ये (प्रसंग ४ प्रमाणे) जमेस  धरले जाते. याला कारण ठरते स्त्रीचे 'अर्थभान' !  वरील पहिल्या तीन  प्रसंगाची जरा कारणमीमांसा करूयात.

 

 प्रसंग १:  आर्थिक गुंतवणूक किंवा निर्णयांविषयी  पती-पत्नी दरम्यान शून्य  संवाद ! याची अनेक कारणे असू शकतात. आजच्या तथाकथित 'स्त्री -पुरुष' समानतेच्या काळातही बऱ्याच घरांमध्ये,  कुटुंबासंबंधित आर्थिक निर्णयांबाबत 'गोपनीयता' राखली जाते. जिथे पत्नी आपल्या पतीच्या बरोबरीने संसाराचा आर्थिक रथ ओढत असते तिथेही असे चित्र दिसते तर गृहिणी असणाऱ्या पत्नीच्या बाबतीत तर काय कथा (आणि व्यथा) असणार? अशा प्रसंगात  पती-पत्नीच्या नात्यात  परस्पर विश्वास, सामंजस्य यांचा अभाव असल्याचे दिसते. कधी स्वभावातील काही गुणदोषांमुळे म्हणा किंवा त्यांच्या भोवतालच्या विशेष सलगीच्या लोकांमुळे म्हणा, घरासंबंधित  आर्थिक निर्णयांची वाच्यता  करणे बरेच जण हेतुपुरस्सर टाळताना दिसतात.  काही कुटुंब प्रमुखांच्या बाबतीत पुरेशी आर्थिक साक्षरता नसल्याने किंवा  बेफिकीर वृत्ती असल्याने,  घरात कुटुंबाच्या आर्थिक भवितव्याशी निगडीत असणारी माहिती न दिल्याने कुटुंबाला काय परिणामांना सामोरे जावे लागू शकते याचे पुरेसे गांभीर्यच आलेले  नसते. हे समजावून घेण्यासाठी एक उदाहरण पाहुयात. आमच्याच कॉलनीमध्ये राहणारा अतुल. अतुलने दोन-चार व्यवसायांसाठी कर्जे काढलेली होती. त्या सर्व व्यवसायांमध्ये त्याला अपयश आले. मग झालेली उधारी चुकविण्यासाठी आपल्या मित्रवर्गाकडून, काही संस्थांकडून  त्याने आणखी कर्जे घेतली. आपल्या  घरात अर्थातच अशा व्यवहारांची  माहिती तो कधीच देत नसे. दुर्दैवाने, एका अपघातात अतुलचा स्वर्गवास झाला. मानसिक धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तर लगेचच अतुलने ज्या-ज्या संस्थांकडून/मित्रांकडून  कर्जे घेतली होती त्या त्या संस्थांचे अधिकारी तसेच  घरात कधीही माहित नसणारे मित्र, पैशांची मागणी करण्यासाठी  दारात येऊन उभे राहिले. अतुलच्या आर्थिक-व्यवहारांबाबत अनभिद्न्य असणाऱ्या त्याच्या घरच्यांना विशेषतः पत्नी मानसीला हे आर्थिक धक्केही  सहन करावे लागले ! पतीच्या पश्चात वृद्ध सासू -सासरे आणि लहान मुले यांच्या आर्थिक भवितव्याबाबत सचिंत असणाऱ्या मानसीचा या सर्व विवंचनांतून बाहेर पडता पडता अगदीच पिट्ट्या पडला. मानसीच्या या अनुभवातून बोध काय घ्यायचा तर अशा अनपेक्षित आर्थिक अडचणी, आपल्या कुटुंबीयांसमोर  कधी उभ्या राहू नयेत  नयेत  यासाठी कुटुंबातील हर एक व्यक्तीने आपल्या आर्थिक व्यवहारांची माहिती घरात वेळोवेळी दिली पाहिजे. घरातल्या स्त्रीनेही जबाबदारीपूर्वक सर्व आर्थिक व्यवहार जाणून घ्यावयास हवे आणि योग्य ठिकाणीच आपल्या घरातील पैसा वापरला जात आहे ना याबाबतीत दक्ष राहायला हवे. नाहीतर परिस्थितीचे आर्थिक चटके संपूर्ण कुटुंबालाच बसू शकतात हे या उदाहरणावरून स्पष्ट होते.       

 

प्रसंग २: काही घरामध्ये आपल्या आर्थिक व्यवहारांबाबत केवळ ‘इन्फॉर्मेशन’ स्वरुपात बोलले जाते. यात घरातील स्त्रीला आर्थिक व्यवहारांबाबत  काहीही गंध नसल्याने किंवा त्यात रस नसल्याने केवळ वरवरची माहिती म्हणून क्वचितच, कधीतरी सांगितले जाते.

इथे मात्र आर्थिक बाबींबाबत स्त्री-वर्गाची असणारी अनास्थाच अडचणींना कारणीभूत ठरते. समजून घेण्यासाठी कविताचे उदाहरण घेऊ. कविताला तिचा नवरा आशिष, घरासाठी केलेल्या आर्थिक तरतूदींबाबत  सुरुवातीला माहिती द्यायचा. पण  कविताला त्यातले फारसे कळत नाही हे लक्षात आल्यावर मात्र तिला त्याबाबत साक्षर करण्याऐवजी  त्याने आपल्या भावाला, प्रकाशला सर्व माहिती द्यायला सुरुवात केली.  आशिषकडून प्रकाशने  सर्व माहिती मिळविल्यावर प्रकाशने त्याला सल्ला द्यायला, गुंतवणुकीत फेरफार करायला सुरुवात केली. आशिषच्या दुर्दैवी निधनानंतर मात्र प्रकाशने कविताच्या नकळत तिच्या कुटुंबाकरिता नियोजलेली  बरीचशी संपत्ती स्वतःच लाटली. या कविताच्या कथेवरून काय दिसते तर आपल्याला अशा माध्यमांचे पुरेसे ज्ञान नाही हे वास्तवाला  'आता वेळ नाही' किंवा 'इतर कामे काय कमी आहेत' अशा सबबी सॊयीस्कररित्या पुढे करुन, स्त्रिया दूर ठेवू पाहतात. आर्थिक बाबींमध्ये सहभागी होण्याच्या संधीला त्या आळसापोटी, अज्ञानापोटी वेळोवेळी दवडतात. 'म्युचुअल फंड्स' , 'टॅक्स रिटर्न्स', 'लोन रिपेमेंट ऑप्शन्स'  इ. सारखे शब्द नुसते ऐकले तरी 'ते सगळे आमच्या ह्यांच्याशी बोला' असा आपल्या 'ह्यां'च्याकडे अंगुलीनिर्देश करून स्त्रीवर्ग  स्वतःची सुटका करून घेतो. खूपच कमी स्त्रिया अशा सर्व बाबी स्वतंत्रपणे हाताळतांना दिसतात. केव्हाही, कुठल्याही आर्थिक विवंचनेस, अनपेक्षीतरित्या  सामोरे जावे लागू शकते ह्याची जाणीव ठेवून प्रत्येक स्त्री ने आर्थिक बाबतीतही आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व आर्थिक योजनांचा, गुंतवणूक माध्यमांचा बारकाईने अभ्यास करण्याची वृत्ती जोपासण्याची आवश्यकता आहे.

प्रसंग ३: काही घरामध्ये कर्ता पुरुषवर्ग दक्षपणे आपल्या आर्धांगिनीला आपल्या कुटुंबास्तव केलेले  आर्थिक नियोजन समजावून सांगण्यासाठी आग्रही असणारा दिसतो. वरकरणी हे चित्र चांगले असले तरी अशा शेअरिंगमध्ये क्वचितच काही स्त्रिया जबाबदारीने सहभाग घेताना दिसतात. बहुंतांश स्त्रीवर्ग जोडीदारावर सर्व आर्थिक निर्णय सोपवून आर्थिक नियोजनातील आपली भूमिका अगदीच नगण्य करून घेतात. घरातील कर्त्यावर असणारा आर्थिक-विश्वास ही चांगलीच गोष्ट आहे मात्र असा विश्वास अनाठायीही असू नये हे कविताच्या उदाहरणातून समोर येते. आपला पेहराव, वागणे-बोलणे, घराचा चेहरा-मोहरा 'अप टू डेट' ठेवणारी स्त्री, तिच्या आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत मात्र  'आउट-ऑफ-डेट' दिसून येते. आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल-मीडियाला  चुटकी(की बोटां)सरशी हाताळणारी स्त्री आर्थिक-निर्णय घेण्याच्या  बाबतीत मात्र  परावलंबीच आहे असे चित्र दिसते.आपल्या कुटुंबाकरिता कुठले आर्थिक निर्णय घेतले जातात आणि घ्यायला पाहिजे यावर स्त्रीलाही आपले स्वतंत्र, अभ्यासपूर्ण मत मांडता आले पाहिजे. आजकाल दरदिवशी तंत्रज्ञानाच्या बरोबरीने आर्थिक क्षेत्रातही बरेच बदल सुरु असतात. ते माहीत करून घेण्यासाठी तंत्रज्ञानही घरात दरडोई (दर हातात !) उपलब्ध असते, तेव्हा मनोरंजनाबरोबरच  आपल्या ज्ञानाच्या  कक्षाही त्यामुळे विस्तारता येतील का याचाही विचार आणि अंमल होणे गरजेचे आहे.

 

वरील प्रसंग आणि उदाहरणे  यातून आजच्या स्त्री वर्गाच्या आर्थिक साक्षरतेवर, दिसणाऱ्या अर्थाभानावर पुरेसा प्रकाश पडतो आहे. जेव्हा प्रत्येक स्त्री, स्वतः हुन, कौटुंबिक जबाबदारीच्या जाणिवेतुन आपल्या आर्थिक साक्षरतेच्या, स्वतंत्रतेच्या बाबतीत पुढचे पाऊल टाकू शकेल तेव्हा स्वतःच्या आणि पर्यायाने सर्वच कुटुंबियांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ती उभी राहू शकेल. स्वतःच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, सुयोग्य अर्थभान मिळविण्यासाठी प्रत्येकीनेच जाणीवपूर्वक प्रयत्न करायलाच हवे.  तसे झाल्यास  प्रसंग ४ घरोघरी घडतांना दिसतील, नाही का ?

जाता जाता आपली आर्थिक साक्षरता वृद्धिंगत करण्यासाठी पुढील चेकलिस्ट देत आहे. ती स्वतःसाठी पडताळून पहा आणि त्यातील संदर्भांची माहिती करून घ्या !

           मी  आर्थिक सर्व-समावेशकतेसाठी सरकार तर्फे जाहीर करण्यात आलेल्या उपयुक्त आर्थिक  योजनांमध्ये  सहभागी झालेले  आहे का ? (उदा. पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना)

           मला  विम्याचे सर्व प्रकार, त्यांचे फायदे ठाऊक आहेत का? माझ्या सर्व कुटुंबियासाठी  अशा  उपाययोजना केलेल्या  आहेत  किवा नाही याची मला माहिती आहे का ? (उदा. आरोग्य / अपघात विमा)

           मला आर्थिक गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची पुरेशी माहिती आहे का ? (उदा. म्युचुअल फंड्स).  मी अशी गुंतणवूक माध्यमे हाताळण्यासाठी पुरेशी सक्षम आहे का?

           मला सोप्या आर्थिक संकल्पना आणि त्यांचे फायदे/ तोटे माहिती आहेत का ? (उदा. इन्फ्लेशन). मी त्यांचा वापर आपल्या कुटुंबाच्या आर्थिक नियोजनासाठी करते का ?

           मला माझ्या घरातील सर्व आर्थिक गुंतवणुकीचा लेखा-जोखा ज्ञात आहे का? त्यासाठी  घरातील सर्व  आर्थिक व्यवहारांची,  निर्णयांची नोंद मी ठेवते का ?

           मी माझ्या घरातील कळत्या वयातील मुलांवर आर्थिक संस्कार देखील  करण्यास सक्षम आहे का?  त्यासाठी अद्ययावत असे ज्ञान माझ्याजवळ आहे का ?

           मी वर्तमानपत्रातील आर्थिक-क्षेत्रातील बातम्या, पुरवणी वाचते का?  आर्थिक-क्षेत्राशी निगडीत पुस्तके, ब्लॉग, कार्यक्रम यांचा वापर, मी माझ्या ज्ञानवृद्धी साठी  करते का?

मैत्रिणिनो, करा विचार, करा अंमल  ! जागवा स्वतःचे अर्थभान ! तुमच्यासाठी ... तुमच्या लाडक्या  कुटुंबियांसाठी !!