Menu

Showing posts with label टेक्नॉलॉजी टॉक्स. Show all posts
Showing posts with label टेक्नॉलॉजी टॉक्स. Show all posts

Tuesday, March 28, 2023

ChatGPT आहे मनोहर तरीही ...

 


मानवी मेंदूची बुद्धीमत्ता आणि आर्टिफिशल  इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रीम  बुद्धीमत्ता यांची तुलना केली असता  मानवी बुद्धीमत्तेचे पारडे नेहेमीच  वरचढ असलेले आपण पहात आलो आहोत. शेवटी कृत्रीम बुद्धीमत्तेला जन्म मानवी मेंदूनेच तर दिला आहे !  परंतु,  ३० नोव्हेंबर २०२२ रोजी, पूर्वी इलॉन मस्क  यांच्या मालकीच्या असणाऱ्या OpenAI या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संशोधन कंपनीने ChatGPT या प्रणालीला जगासमोर ठेवले आणि आणि कृत्रीम  बुद्धीमत्तेला झुकते माप पडते की काय अशी परिस्थती निर्माण झाली !!

खरे पाहता ChatGPT ही AI वर आधारित टेक्स्ट-चॅटबॉट आहे, भारतातही बँकिंग, ट्रॅव्हल्स, टेलिकॉम इ. क्षेत्रांत, ग्राहकांना  काही ठराविक सेवा पुरविणाऱ्या चॅटबॉट आपण पाहतो ज्या टेक्स्ट किंवा व्होईस कमांडद्वारे दिलेल्या प्रश्नांची, त्या त्या  संस्थेच्या वतीने उत्तरे देतात. तशीच पण कुठल्याही एका क्षेत्राशी मर्यादित नसणारी किंवा सर्वज्ञानीच असणारी ही ChatGPT !!  तुम्ही तिला कोणतेही प्रश्न टेक्स्ट म्हणजे लिखित स्वरूपात विचारा आणि ही  प्रणाली तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे टेक्स्ट स्वरुपात देते. बरे मिळणारी उत्तरे इतकी संयुक्तिक आणि परिपूर्ण असतात की जणुकाही तुम्ही तुमच्या एखाद्या तज्ञ्, परिचित मित्राबरोबरच संभाषण करत असल्यासारखा अनुभव तुम्हाला येतो !  तुमचे प्रश्नही कितीतरी वेगवगळ्या स्वरुपाचे असू देत जसे की एखाद्या विषयासंबंधित माहिती किंवा सारग्रहण ! काव्य  किंवा कथा ! विनोद किंवा भाषांतर, कोडिंग किंवा प्रोग्रॅम्स.  तुम्ही बस ChatGPT ला तुमचा हेतू किंवा अडचण योग्य शब्दात सांगा आणि तिचे उत्तर  ChatGPT तुमच्यासमोर हजर करते !! 

याचा परिणाम म्हणून इतक्यादिवस गुगल कडून मिळालेल्या 'माहिती'वर निर्भर असणारी सारी टेक्नोसॅव्ही  गुगल-पंडित  जनता आता ChatGPT द्वारे सादर होणारे  'ज्ञान' ग्रहण करते आहे !!  तेही मोफत, चुटकीसरशी, हवे  तेव्हा, हवे त्या भाषेत आणि हवे त्या स्वरूपात !! यामुळे आठवड्याभरात साधारणपणे लाखापेक्षा जास्त वापरकर्ते ChatGPT कडे वळताहेत !! यात नोकरदार, व्यवसायिक आणि अगदी विद्यार्थीही  आघडीवर आहेत !! म्हणजे ChatGPT ची कृत्रीम  बुद्धीमत्ता या सर्व व्यवसाय अथवा नोकरी-पेशांवर गदा आणते की काय अशी परिस्थती निर्माण होते आहे आहे ! उदाहरणार्थ ChatGPT द्वारे  स्टेनो   योग्य तो मजकुर लिहून घेत आहेत, व्यावसायिक त्याचा व्यवसाय कसा वृद्धिंगत करावा यावर सल्ला घेत आहेत , शिक्षक एखाद्या विषयावरची प्रशपत्रिका तयार करून घेत आहेत तर  विद्यार्थी एखाद्या संकल्पेनवर निबंध उतरवत आहेत !!

अशी सगळीच कामे  ChatGPT द्वारे होत असताना कौशल्यप्रधान आणि गुणीभूत माणसाची मला खरोखरच सल्लागाराची गरज आहे का असा व्यावसायिकपणे  विचार व्हायला लागला आहे !! अनेक क्षेत्रे, नोकऱ्या यांवर गंडांतर येण्यास सुरुवात झालेलीच आहे !!  ChatGPT च्या अफलातून संशोधनाला 'भीती, धमकी" अशा विशेषणांबरोबरही जोडले जाऊ लागले आहे ! आणि तेव्हाच  सुद्न्य माणसाला प्रश्नही पडतो आहे की या मनोहर दिसणाऱ्या वर्तमानानंतर येणारा भविष्यकाळ कसा बरे असेल ?

माणसाची अभ्यासू वृत्ती, विचार करण्याची सवय, मेंदूला ताण देऊन विश्लेषण करण्याची क्षमता यांवर ChatGPT आघात करते आहे का ? जेव्हा 'अमका विषय मला १०० शब्दात समजावून सांग' अशा स्वरूपाच्या प्रश्नांना ChatGPT चपखल आणि संयुक्तिक  उत्तर देते आहे तेव्हा वर्तमान पिढी एखाद्या विषयाच्या मूळापर्यत जाऊन तो विषय अभ्यासेल का ? जर 'मला तमक्या विषयावर दोन पानाचा निबंध लिहून दे' अशा  आज्ञेला शिरसावंद्य मानून ChatGPT योग्य ते ज्ञान  समोर मांडते आहे तर विद्यार्थी, संबंधित विषयावरची  पुस्तके वाचतील का ? थोडकाय काय तर  कृत्रिम मेंदूचा होणारा वाढता वापर हा मानवी मेंदूला गंज लावतो आहे ! भारतीय बुद्धिमत्तेला जगभरातुन मागणी असण्याचे कारण म्हणजे भारतीयांची  तल्लखता !! या अभिनित तल्लखतेवर, सृजनशीलतेवर, मनोव्यापारावर  परकीय तंत्रज्ञानाचे वाढते आक्रमण धोकादायकच आहे !! सगळ्यांनीच  या तंत्रज्ञानाचा वापर नियंत्रित, मर्यदित , समतोल साधूनच करावयास हवा.   म्हणूनच, वर्ममान आहे मनोहर तरीही , "सावध ऐका पुढच्या हाका आणि तंत्रज्ञान वापराचा समतोल राखा !!"       

Wednesday, May 19, 2021

डिजीटल साहित्य संस्कृती

 

डिजीटल साहित्य संस्कृती


एका सर्वेक्षणानुसार, कोविडच्या कालावधीमध्ये  इंटरनेटचा वापर ४०% ते ६०% ने वाढला आहे !  ह्याला जसे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शाळा, कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन मिटींग्स, जनसामान्यांचे ऑनलाईन  शॉपिंग आणि  डिजीटल मनोरंजन कारणीभूत ठरले तसेच साहित्यप्रेमींचे ऑनलाइन वाचनही !!  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे, ज्या विविध क्षेत्रांवर कामकाजासंबंधात मर्यादा आल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे 'ग्रंथालये / वाचनालये'.  अर्थात जिज्ञासु, वाचनवेडे यावर उपाय न शोधते तरच नवल !  या साथीच्या कालावधीत,  २००४ साली सुरु झालेल्या ऍमेझॉनच्या किंडल पासून ते आजच्या स्टोरीटेल ऍपपर्यंत, विविध माध्यमांचा उपयोग करून घेत, वाचकांनी आपली साहित्यिक भुक भागवली !!  डिजीटल वाचन आणि साहित्य संस्कृतीचा आलेख चढता ठेवणाऱ्या काही माध्यमांविषयी आज जाणून घेऊयात !

ऍमेझॉन किंडल: या  प्रोजेक्टने  खऱ्या अर्थाने  'डिजीटल वाचन संस्कृती' उदयास आणली. त्याआधी ऑनलाईन वाचन हे बहुतांश करून वृत्तपत्रे आणि मोजक्या ब्लॉग्स पर्यंत सीमित होते.किंडल हे  हातात धरणेयोग्य, टॅबलेटसम डिव्हाईस आहे. किंडल बाजारात येताच  ई-वाचकांचा समुदाय झपाट्याने वाढीस लागला. किंडलने आधी मालिका (series) स्वरूपात ई-साहित्य उपलब्ध करून दिले त्यामुळे वाचकांची उत्कंठा वाढीस नेवून त्यांना या प्रोजेक्टकडे  आकर्षित करण्यात, ऍमेझॉन  कमालीचे यशस्वी ठरले ! आज किंडल स्टोअरवर  ई-पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके आणि इतर डिजिटल साहित्या संदर्भांत  ब्राउझ करणे, खरेदी करणे, डाउनलोड करणे आणि वाचने  असे बहुविध पर्याय उपलब्ध आहेत.  इन बिल्ट इंटरनेट सुविधा, चांगले बॅटरी लाईफ, खरे पुस्तक वाचल्याप्रमाणे अनुभव देणारी साहित्याची रचना, बुक मार्किंग, बहुविध भाषांमधील विशाल साहित्याची उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे किंडलची लोकप्रियता आजही टिकून आहे. साधारण अडीच हजारांपासून पुढील किंमतीत, किंडल उपलब्ध आहे.

स्टोरीटेल: ही जगभरात वापरली जाणारी ऑडिओ-बुक आणि ई-बुक सेवा आहे.  या ऍपवर   5,00,000 हून अधिक पुस्तके वाचणे आणि ऐकणे दोन्ही शक्य होते. याद्वारे इंग्रजी आणि इतर भाषांमधील आपल्या आवडत्या लेखकांच्या कथांचा आनंद वाचक आणि श्रोत्यांना मिळू शकतो. पुस्तकाचा आनंद घेताना, वापरकर्ता वाचन आणि ऐकणे या मोड्स दरम्यान  बदल करू शकतो तसेच वाचनाच्या वेग ऍडजस्ट करू शकतो.  कथा, कादंबरी, चरित्रकथा  यांच्याबाबत  आवडीनुसार शिफारशी मिळविणे, मुलांसाठी असणाऱ्या  'किड्स मोड' द्वारे मुलांनाही आवडेल असे साहित्य मिळविणे, कोठेही आनंद घेण्यासाठी ऑफलाइन डाउनलोड करणे आणि मुख्य म्हणजे गोष्टी ऐकण्याचा 'बेड टाइम' अनुभव घेता येणे यामुळे स्टोरीटेलचे वापरकर्ते दिवसेंगणिक वाढतच आहेत. सुरुवातीचे काही दिवस फी आणि नंतर साधारण ३०० रु प्रति महिना, असे  सभासदत्व स्टोरीटेलमार्फत देण्यात आलेले आहे.   मुक्ता बर्वे ,अमेय वाघ, संदीप खरे इ. प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या आवाजातुन साहित्य अनुभवायची संधी  स्टोरीटेलने दिलेली आहे.         

बहुविध: विविध डिजिटल माध्यमांवर उपलब्ध असलेलं सगळं साहित्य फुकटच असलं पाहिजे, या समजुतीला छेद देणारा पहिला मराठी प्रयत्न म्हणजे बहुविध.कॉम ! वर्षभरात हजारो  साहित्यप्रेमींनी याचे सशुल्क सभासदत्व घेऊन हा प्रयत्न सार्थ ठरवला आहे. सध्या विविध माध्यमांतून माहितीचा लोकांवर अक्षरशः भडिमार होत आहे. पण त्यातून दर्जेदार तेव्हढेच नेमके टिपून, ऊत्तम अभिरुची जोपासणाऱ्या वाचकांसमोर ठेवण्यात बहुविध यशस्वी ठरले आहे. मराठी भाषेतील जुन्या अप्रतिम लेखांना, नवीन रूप देऊन निवडक दिवाळी अंक, बालसाहित्य व इतर काही श्रेणीतील उत्तम साहित्य इथे उपलब्ध आहे. आशयघन साहित्याच्या शोधार्ध असणाऱ्या वाचकांचा वेळखाऊ, निरर्थक ब्राऊजिंग करण्याचा वेळ बहुविधमुळे नक्कीच वाचतो ! संकेतस्थळ : https://bahuvidh.com

ई-पुस्तकालय: गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणारे हे अँड्रॉइड ऍप ! इथे मराठी, हिंदी, संस्कृत तसेच बंगाली  भाषेतील विविध साहित्यप्रकार जसे ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, काव्य, बालसाहित्य इ. श्रेणीतील लोकप्रिय साहित्य उपलब्ध आहे. या ऍपचे वापरकर्ते, लेखकाचे नाव, शीर्षक, प्रकाशक आणि  कीवर्डवर आधारित साहित्य  शोधू शकतात. साहित्या संदर्भातील व्हिडिओ , डिओ क्लिप्स,  शैक्षणिक खेळ, डाउनलोड करण्यारखी पुस्तके यामुळे या ऍपला लोकप्रियता लाभलेली आहे.           

वाचकांच्या उपयुक्त ठरू शकतील अशी अजून काही डिजीटल माध्यमे / ऍप : ऑडिबल, पु. ल. देशपांडे कथाकथन, व, पु. काळे कथाकथन   साहित्यचिंतन.कॉम , ई-साहित्य.कॉम  आदी !     

कोरोना कालावधीत हाताशी मोकळा वेळ मिळाल्यास या माध्यमांचा वापर करून, वाचक   ' घरचेच सुरक्षित डिजीटल वाचनालय'  नक्कीच अनुभवु शकतात !      

 

डॉ. रुपाली कुलकर्णी,

ऍडजंक्ट प्रोफेसर  , संगणक विभाग 

का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय,

नासिक,      

   

     ९०११८९६६८१, rdkulkarni21@kkwagh.edu.in

 

Tuesday, May 18, 2021

ईच्छा तेथे ... शिक्षण !

 


ईच्छा तेथे ... शिक्षण ! 

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे आपण सर्वजण वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या तीव्रतेची आव्हाने पेलत आहोत.  आरोग्य, आर्थिक आणि मानसिक स्तरावर कोरोना विरुद्धची लढाई लढली जातेच आहे.  पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांना शैक्षणिक स्तरावरही बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले आहे.  ऑनलाईन शिक्षणाच्या विविध पद्धती, माध्यमे , परीक्षां संबंधित बदल  आणि त्यायोगे उद्भवणाऱ्या मानसिक  ताणतणाव !  परंतु आता शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा मार्गी लागल्या आहेत आणि पुढील शैक्षणिक वर्षाआधी  विद्यार्थ्यांच्या  हाती बऱ्यापैकी रिकामा वेळ उपलब्ध होणार आहे.  शालेय किंवा महाविद्यालयीन  शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा अभ्यासक्रमा बाहेरची काही जोड कौश्याल्ये मिळविण्यासाठी  उद्युक्त केले जाते . परंतु       दैनंदिन शिक्षणाच्या धावपळीत त्यांना  अशा  गोष्टी शिकणे,  आत्मसात करणे यासाठी वेळ कमी पडत असतो. आता मात्र पुढे मिळणाऱ्या वेळाचे  जर चांगले नियोजन केले तर त्यातुन बऱ्याच गोष्टी साध्य करता येणार आहेत, जसे  तांत्रिक  किंवा  वैयक्तिक  पातळीवर नवीन गुणकौशल्ये  आत्मसात  करणे किंवा आधीपासून असणाऱ्या कौशाल्यांना अजून वरच्या पातळीवर नेणे ! आजच्या या तांत्रिक युगात, ऑनलाईन शिक्षणासाठी  अनेक  वैविध्यपूर्ण प्लॅटफॉर्म्स किंवा अँप्लिकेशन्स उपलब्ध आहेत आणि त्यांचा सुयोग्य वापर केल्यास  हे जमवणे शक्य आहे. परंतु कुठल्या ऑनलाइन गुरूजवळ कोणत्या प्रकारचे ज्ञानभांडार किंवा प्रशिक्षण उपलब्ध आहे याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.  अशा ऑनलाईन संसाधनांविषयी जाणून घेऊयात.   

 

·         NPTEL:एनपीटीईएल  (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्व्हान्सड लर्निंग) हा भारतातील ज्ञानमहर्षी समजल्या जाणाऱ्या आयआयटी संस्थांच्या  पुढाकाराने उभा राहिलेला उपक्रम आहे ज्याद्वारे अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण मिळविणे शक्य होते. या   उपक्रमाच्या संकेतस्थळावर पाचशेहुन अधिक व्हिडीओ कोर्सेस उपलब्ध आहेत जे संबंधित शिक्षण साहित्याबरोबर विनामुल्य उपलब्ध आहेत. हे सर्व व्हिडिओ कोर्स डाऊनलोड करता येतात जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या सोयीच्या वेळेप्रमाणे नवीन संकप्लना अथवा विषय समजणे शक्य होते.

संकेतस्थळ : http://nptel.ac.in.

·         SWAYAM : स्वयंम (Study Webs of Active-Learning for Young Aspiring Minds) हा भारत सरकारचा उपक्रम असुन मानव संसाधन विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या सहकार्यातुन उभा राहिलेला आहे. या माध्यमातून २००० हुन अधिक विषयावर विनामुल्य कोर्सेस उपलब्ध आहेत. याद्वारे  अभियांत्रिकी, विज्ञान , गणित, भाषा, व्यवस्थापन,मानवता आदी अनेक विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ माध्यमातून शिक्षण उपलब्ध आहे. विविध संकल्पना सुस्पष्ट करण्यासाठी ऍनिमेटेड व्हिडीओज,  डाऊनलोड करता येण्यासारखी   डिजिटल पुस्तके, शंका-निरसनासाठी स्वतंत्र पोर्टल ही स्वयंमची वैशिष्टये !  काही ठराविक कोर्सेससाठी किंवा पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रासाठी शुल्क आकारले जाते.      

संकेतस्थळ : http://swayam.gov.in  

·         MOOC: मुक  (Massive Open Online Courses -MOOCs) जगभरातील विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या विषयातील उच्चस्तरीय ज्ञान मिळवून देण्यासाठी  MOOC साहाय्यभूत ठरते आहे. अनुभवी प्राध्यपकांनी प्रमाणित केलेला अभ्यासक्रम तसेच शैक्षणिक साहित्य, व्याख्यानांचे व्हिडिओ, संदर्भ साहित्य येथे उपलब्ध आहे. विद्यार्थी यातील आवडत्या माध्यमाचा वापर करून, आपापल्या गतीने आणि भाषेतुन  विषयांचे ज्ञान मिळवू शकतात.  

संकेतस्थळ : https://www.mooc.org/

·         व्यावसायिक ऑनलाईन माध्यमे: वरील माध्यमां व्यतिरिक्त अनेक  व्यावसायिक ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचे पर्यायही  विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.  उदारणार्थ BYJU’s, UnAcademy, Udemy, Toppr, Vendantu  इ.  याद्वारे काही किमान शुल्क भरून वेगवेगळ्या विषयातील ज्ञान मिळविता येणे शक्य झाले आहे. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा, मुलाखती यांची तयारी करण्यासाठीही  ही माध्यमे उपयुक्त ठरतात. सराव वर्ग, सराव परिक्षा, स्वतंत्र वेळेत तज्ज्ञांची उपलब्धता, परीक्षां संदर्भांत समुपदेशन इ. वैशिष्टयांमुळे तरुण पिढी या ऑनलाईन गुरूंकडे आकर्षित होताना दिसते आहे. 

अर्थात योग्य निवड करण्यासाठी आपल्याकडे असणारी डिजिटल  साधने, इंटरनेट कनेक्टिव्हिटी,  स्वानुभवातून आणि स्वयं अध्ययनातून  सलगपणे शिकण्याची,  कोर्स पूर्ण करण्याची तयारी, शिक्षणाचे शुल्क, लागणारा  कालावधी आणि  निवडलेल्या अभ्यासक्रमाला व्यावसायिक क्षेत्रात असणारी मान्यता  या सर्वांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्या त्या क्षेत्रातील अनुभवी वर्गाचा, शिक्षकांचा सल्ला घेता येईल. शेवटी या विशाल ज्ञानभांडारातून, वेचावे तितके कण कमीच आहेत !! परंतु 'ईच्छा तेथे मार्ग' असतोच !  ज्ञानार्जनाची कास धरून या ज्ञानसागरात मारलेली उडी, अपेक्षित तीरावर तुमची नाव नक्कीच पोहोचवू शकते !!

डॉ. रुपाली कुलकर्णी,

ऍडजंक्ट प्रोफेसर  , संगणक विभाग  

क.   का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय,

नासिक,      


बिग डेटा आणि भविष्यातील संधी !!

बिग डेटा आणि  भविष्यातील संधी !!

एकविसावे शतक हे माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड वेगाने होणाऱ्या बदलांचे  साक्षीदार आहे । आज आपण सर्वजण, चुटकीसरशी कामे करण्यासाठी  डिजिटल आणि इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या उपकरणांचा  आणि अँप्लिकेशन्स वापर करत असतो. आपण या  डिजिटल माध्यमांवर इतके अवलंबून असतो की आपले आयुष्यच आपण डिजिटली जगत असतो, असे म्हटल्यास त्यात कुठलीही अतिशोयोक्ती होणार नाही ! ! पण हे इंटरनेट प्लॅटफॉर्म्स  किंवा उपकरणे आपल्याविषयी नकळत, आपली बरीच माहिती जमा करत असतात.

 

उदाहरण देऊन सांगते. मागे एकदा मला वॉशिंग मशीन विकत घ्यायचे होते.  तेव्हा सवयीप्रमाणे  आवडत्या ई-कॉमर्स एप्लीकेशनवर जाऊन वेगवेगळ्या ब्रँडच्या वॉशिंग मशीन्सची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या किमतींची तुलना करून पाहिली. दिवसभराचा कामाच्या व्याप संपल्यावर , संध्याकाळी ऑफिस मधून घरी निघताना सहजच फेसबुक उघडले तर वेगवेगळ्या वॉशिंग मशीनच्या सजेशन्सनी वॉल भरून गेली होती.  पार्किंग मधून कार काढली आणि घरी निघाले तर कोपऱ्यावरचा  डिजिटल मॉल  जवळ  येण्याच्या आधीच मोबाईलवर मेसेज झळकला की तुम्ही शोधत असलेले वॉशिंग मशीन या शॉप मध्ये मिळू शकेल.  रात्री उशिराने इंस्टाग्राम उघडले तरी स्वागताला वॉशिंग मशीन पोस्ट्स इथेही हजर ! तर हे सगळे ज्याप्रकारे शक्य होते त्यामागे अदृश्यरित्या  कार्यरत असतो तो बिग डेटा !! आपण सगळेच, हरक्षणी विविध डिजिटल उपकरणे, इंटरनेट माध्यमे, इ-सेवा, अँप्लिकेशन्स, सेन्सर्स  यांच्यामाध्यमातून डिजिटली वेढले गेलेलो असतो !  हे सगळे मध्यस्थ, तुम्ही कुठले माध्यम वापरता, इंटरनेटवर कुठली माहिती शोधता, कुठले व्हिडिओज बघता, सोशल मीडियावर तुम्ही  केव्हा,किती आणि कसे व्यक्त होता, यावर बारीक नजर ठेवून असतात !  आणि जगभरातल्या अशा समस्त जनतेबाबत जेव्हा हे घडते तेव्हा  ही माहिती अर्थात डेटा  प्रचंड आकाराने, वेगाने आणि वेगवेगळ्या स्वरूपात जमा होत रहातो ! हा अवाढव्य माहितीचा साठा  म्हणजेच बिग डेटा ! या बिग डेटा चा वापर करून अनेक उद्योग आणि व्यवसाय भरभराटीस येत आहेत. संभावित ग्राहकांना आपल्या उद्पादनांकडे आकर्षित करणे, आधीपासून ग्राहक असलेल्यांना योग्य वेळेत, सुयोग्य शिफारसी  देऊन त्यांच्याशी  असणारी बांधिलकी जपणे,  ज्या गोष्टींची आवश्यकता ग्राहकांना भासू शकेल अशा उत्पादनांनविषयी त्यांना आगाऊ माहिती पुरविणे  आणि त्या माध्यमातून आपल्या उद्योगाची भरभराट करणे हे बिग डेटाचा  कल्पक आणि सर्जनशील वापर केल्यामुळे  शक्य होते आहे. यातूनच नोकरी आणि उद्योगाच्या अनेक वाटा आणि संधी येणाऱ्या पिढीपुढे उकलत आहेत. संपूर्ण जगभरात या बिग डेटा चळवळीमुळे  रोजगाराच्या संधी, अक्षरशः हजारोंनी तयार होत आहेत. या संधीचा उत्तम फायदा करून घेण्यासाठी येणाऱ्या पिढीने आपली या संबंधित तांत्रिक कौश्यले आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे ! या संबंधित, नोकरीत कुठली पदे उपलब्ध होत आहेत त्यावर थोडासा उहापोह.

•          डेटा ॲनालिस्ट: यामध्ये बिग  डेटाचे  विश्लेषण करणे, वर्गवारी करणे आणि अशी गाळीव, प्रमाणित असणारी  माहिती व्यवसायासाठी उपयुक्त अशा  स्वरूपात तयार करणे हे मुख्य काम असते.

•          डेटा इंजिनियर: यामध्ये बिग डेटाच्या स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या माहितीचे, व्यवसायाच्या भरभराटीसाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण करता येणे आणि त्याद्वारे  ती माहिती संरचित करणे हे काम असते.

•          डेटा आर्किटेक्ट: बिग डेटा हा त्याचे प्रचंड आकारमान, उपलब्धतेचा प्रचंड वेग आणि त्याचे वेगवेगळे स्वरूप यातील वैशिष्ट्यांमुळे ओळखला जातो.  तेव्हा या प्रचंड माहिती साठ्याचे जतन करणे,  त्याची सुरक्षा बघणे आणि गरजे प्रमाणे त्याचा पुरवठा करणे हे एक आवाहनात्मक कार्य असते. डेटा आर्किटेक्ट नेमके हे  काम बघतो

•          डेटा  कन्सल्टंट: बिग डेटामध्ये दडलेल्या माहितीचे जोपर्यंत सुयोग्यरित्या आकलन होत नाही तोपर्यंत ती माहिती नाही तर केवळ डेटाच असतो !  व्यवसायामध्ये  विविध स्तरांवर  काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या माहितीचे सुयोग्य आकलन होईल या पद्धतीने तिचे सादरीकरण करणे आणि विविध आलेख, चार्ट, नकाशे या माध्यमातून ती त्यांच्या समोर प्रस्तुत करणे हे डेटा कन्सल्टंटचे काम  असते.

 

या रोजगार संधींशी  जवळीक  करण्यासाठी मशीन लर्निंग, आर प्लॅटफॉर्म , पायथोन तसेच  जावा प्रोग्रामिंग, मॅटलॅब, डेटाबेस ऑपरेशन्स आदी तांत्रिक कौश्यालयांची गरज असते. कोविडच्या या काळात विद्यार्थ्यांपुढे शैक्षणिक आव्हाने जरी असली तरी वेळही उपलब्ध आहे.  आणि म्हणूनच या वेळेच्या उपलब्धतेचे सोने करण्याची  संधीही तितकीच आहे.  Byju's, Udemy, YouTube  सारखे  ऑनलाईन गुरु  उपलब्ध असताना हे करणे सहज शक्य आहे ! तेव्हा बिग डेटाने निर्माण केलेल्या या  संधींचा लाभ घेण्यासाठी या माध्यमांचा  उपयोग नक्कीच करता येईल !! माहिती आणि ज्ञानाचे हे भांडार जितके विशाल आहे  तितकेच रंजकही ! यात जरा डोकावून तर बघुयात ... ऑल दि बेस्ट !!  

डॉ. रुपाली कुलकर्णी,

ऍडजंक्ट प्रोफेसर  , संगणक विभाग  

क.   का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय,

नासिक,      

९०११८९६६८१,

      rdkulkarni21@kkwagh.edu.in