Tuesday, June 1, 2021

गरज ..कौटुंबिक अर्थ साक्षरतेची !!

 


गरज ..कौटुंबिक अर्थ साक्षरतेची !!

कोविडच्या या दुसऱ्या त्सुनामीत अनेक कुटुंबांमध्ये  घरातील कर्ता  किंवा कुटुंबातील मिळकत असणारा व्यक्ती  यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या कठिण कालावधीत त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी जेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष किंवा फोनवर संवाद साधला तेव्हा असे लक्षात आले की परिवारातील इतर सदस्यांना, मृत झालेल्या व्यक्तीच्या नावे असणाऱ्या मालमत्ते विषयी, त्याने केलेल्या आर्थिक व्यवहारांविषयी  फारच जुजबी माहिती होती. त्याचाच परिणाम म्हणुन, मिळवित्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्य आर्थिकदृष्टया हतबल झालेले दिसले !

पण अशा आजूबाजूला घडणाऱ्या अनेक प्रसंगांमुळे, आपल्या कुटुंबियांना वेळीच अर्थ साक्षर करणेसाठीचे, घरातील आर्थिक निर्णयांबद्दल, व्यवहारांबद्दल त्यांना माहिती देण्याचे महत्व उद्धृत झालेले आहे ! या कालावधीत  त्यांना मानसिक आधार देण्या व्यतिरिक्त ज्या काही व्यावहारिक गोष्टी करणे  क्रमप्राप्त  होते ते करतांना अशा समदुःखी  इतर परिवारांसाठीही उपयुक्त ठरेल अशी चेकलिस्ट बनविता येईल का असा विचार केला आणि पुढीलप्रमाणे काही मुद्दे तयार केले.  ज्यांच्या घरामध्ये कुटुंबातील सदस्याचा मृत्यू ओढवलेला आहे, त्यांनी पुढील काही बाबी तपासून  पाहाव्यात आणि इतरांनी त्याबाबतीत वेळीच सजग व्हावे !

जीवन तसेच आरोग्य वीमा:  सर्वप्रथम दिवंगत सदस्याचा जीवन विमा काढलेला आहे का हे पहा . जीवन विमा एक किंवा अधिक संस्थांमध्ये काढलेला असू शकतो ही  शक्यता तपासून पहा. काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा तसेच जीवन विमा काढलेला असतो.  त्याद्वारे सुद्धा  कुटुंबियांना लाभ मिळू शकतो.  तसेच या सदस्याच्या बँक अकाउंट मधून  पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा  हप्ता  जर  वर्ग  झाला असेल  तर त्या योजने अंतर्गतही रुपये दोन लाख इतका लाभ कुटुंबियांना मिळू शकतो.  दिवंगत सदस्याचा मृत्यू जर उपचार घेताना इस्पितळात झालेला असेल तर आरोग्य विमा लाभ देखील उपलब्ध होऊ शकतो.  तेव्हा सदस्याच्या जीवन तसेच आरोग्य विमा पॉलीसी  पडताळून पहा. याबाबतीत योग्य वेळेत मृत्यूचा दाखला आणि लागू असल्यास इस्पितळाची सर्व  बिले सादर करावी लागतात.

कर्मचारी सुविधा:  दिवंगत व्यक्ती कार्यरत असणाऱ्या कंपनीमध्ये भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, बोनस, पेन्शन,  गेल्या महिन्याचा  पगार, जमलेल्या रजांचा पगार, ग्रुप वीमा, सोसायटी लाभ असे  अन्य काही लाभ कंपनी देत असल्यास ते पडताळून पहा.  त्यासाठी आवश्यक असणार्या कागदपत्रांची पूर्तता करा.   

बँक खाते अथवा मुदत ठेवी: दिवंगत सदस्याच्या नावाने किती ठिकाणी बँक/ मुदत ठेव  खाती होती आणि त्याची  कागदपत्रे जसे पासबुक, चेकबुक, बँकेची स्टेटमेंट तपासून पहा.  संबंधित बँकांमध्ये जाऊन मृत्यूचा दाखला तसेच नामांकन असणाऱ्या व्यक्तीचे इतर कागदपत्रे सादर करा. अशा व्यक्तीचा मोबाईल तपासून पाहिल्यास एस. एम. एस. द्वारे आलेले बँकेचे स्टेटमेंट किंवा मोबाईल मध्ये असणारे बँक ॲप्लिकेशन याद्वारेही माहिती प्राप्त करून घेता येऊ शकते.

इतर गुंतवणूक:  दिवंगत व्यक्तीच्या नावाने म्युच्युअल फंड, शेअर्स, पोस्टातील, खाती स्थावर मालमत्ता इत्यादी ठिकाणी गुंतवणूक असल्यास त्या संबंधित कागदपत्रे तपासून पाहता येतील.  परिवाराशी संबंधित अर्थ सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंटंट आपल्याला पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक कागदपत्रे/ स्टेटमेंट्स काढून  देऊ शकतात. अशा व्यक्तीच्या नावे जर कुठे लॉकर सुविधा घेतलेली  असेल तर तेथेही बचत अथवा गुंतवणुकीचा ऐवज किंवा कागदपत्रे ठेवलेली असू शकतात याचीही नोंद घ्या.

खर्च/ दायित्वे: दिवंगत सदस्यांच्या नावे काही कर्ज घेतलेले असल्यास त्याचे हप्ते कुठल्या बँक खात्यांमधून  वर्ग होत आहेत  हे तपासून घ्या. बँक खात्यांमधून वेगवेगळे हप्ते जसे गृहकर्ज, वाहनकर्ज,  विमा हफ्ते , म्युच्युअल फंडातील एस.आय.पी. इत्यादी वर्ग होऊ शकतात. त्याची वेळेवर दखल घ्या. दिवंगत सदस्य जर प्राप्तीकर भरत असेल तर प्राप्तिकराची  कागदपत्रे तपासून पहा.  काही ठिकाणी टी.डी.एस. वर्ग केलेला असू शकतो त्याविषयी  माहिती जाणून घ्या.

कोरोना कालावधीत ओढवलेल्या या  परिस्थितीत, 'अर्थ साक्षर परिवार ' असणे, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे इच्छापत्र असणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते आहे. घरातील प्रत्येक मिळवित्या सदस्याने, कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या सर्व आर्थिक बाबींचे  नोंदनीकरण करणे, घरातील सर्व सदस्यांना केलेल्या आर्थिक व्यवहारांविषयी तसेच तरतुदींविषयी माहिती देणे आणि त्यायोगे त्यांना अर्थ साक्षर करणे गरजेचे आहे . असे केल्याने एखाद्या कुटुंबाची वास्तविक, आर्थिक परिस्थिती आणि त्यायोगे असणारी आपली जबाबदारी याचे भान  सर्व सदस्यांना  स्पष्ट होण्यास मदत होते. कोरोना कालावधीत आजुबाजुला घडणारे  प्रसंग डोळसपणे पाहुयात आणि  आपल्या कुटुंबियांना आपल्या घरातील आर्थिक घडमोडींची पूर्ण माहिती, देऊयात.

तुमच्या आणि परिवाराच्या आरोग्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा !! भवतु सब्ब मंगलम् !!

Thursday, May 27, 2021

ओपन-अप !!

आज नेहेमीप्रमाणे प्रसन्न अशा सकाळीचे आगमन झाले. विविध पक्ष्यांचे मंजुळ प्रभातगान कानी पडताच, उठून  सकाळच्या  फिरायला जाण्यासाठी तयार होत होते.  परंतु पूर्ण रात्र गेली तरीही,  काल ऑफिसमध्ये घडलेल्या वादविवादाचे विचार डोक्यात पुनः डोकावले आणि मनावर परत  उदासीचे  मळभ दाटले. तरिही, बाहेर पडल्यावर बरे वाटेल म्हणून मी नवरोबांच्या मागे गुमान चालू लागले. तेव्हा मनात  विचार डोकावला की आपल्या स्वतःच्याच मनाला असे 'गार्बेज ट्र्क' बनविण्यापेक्षा जरा बाहेरच्या वातावरणाशी ओपन-अप होऊन बघुयात , समरस होण्याचा प्रयत्न करूयात  ! आणि माझ्या प्रयत्नांना यश आले ! मॉर्निंग वॉकला जातांना 'सैगल मुड' मध्ये असणारी मी, येतांना मात्र 'ओ.पी. नय्यर' मुडमध्ये घरात प्रवेशती झाले. आणि त्या दिवशीच्या शारिरीक व्यायामाच्या वेळेत जो मनाचा 'ओपन-अप' व्यायाम केला होता तो आता 'सैगल मुड' चा जराही  सुगावा लागताच  प्रयत्नपूर्वक करणे चालू केले आहे. मनावर पोझीटीव्हीटीची मोहिनी घालणाऱ्या अशा क्षणांनी तेव्हापासून  मॉर्निंग वॉकची आणि पर्यायाने त्यांनतर जाणाऱ्या दिवसभराच्या  प्रसन्नतेत चांगलीच भर घातली आहे. सकाळी - सकाळी खुल्या मनाने, हृदयाने शरीरात  उत्साह,ऊर्जा  भरून घेतली  तर त्यापुढे  येऊ घातलेला  दिवस हा एक सुंदर दिवस बनण्याची शक्यता  कितीतरी पटीने वाढते !  या माझ्या  'ओपन-अप'  अनुभवाविषयी  थोडेसे ...

दररोज वॉकच्या  वेळेत बरेच ओळखीचे, अनोळखी, काही एकटे तर काही  ग्रुप करून चालणारे वॉकर्स आजूबाजूला  दिसत असतात. आपापल्या विचारामध्ये मग्न राहून चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीस करावे कधीतरी   उत्साहपूर्वक, दिलसे  'गुड मॉर्निंगss' किंवा 'सुप्रभातss'  असे  अभिवादन !! नकळत दोघांच्याही मनात ऊर्जा भरून जाते. चेहेऱ्यावर क्षण-दोन क्षणांसाठी हास्य फुलविते ! आम्हीही रोज अशाच एका वयोवृद्ध जोडप्याला रोज बघायचो. त्यातल्या आजी, आजारी दिसणाऱ्या आजोबांना हाताने आधार देत चालवीत असायच्या. त्या आजोबांच्या फिरणाच्या उत्साहाला एक दोनदा 'भारी आजोबा' किंवा 'आज प्रगती आहे बरं का आजोबा ' अशी मनःपूर्वक दाद दिल्यावर, आता ते आजोबा रोज स्वतःहूनच हसून, हात हलवून अभिवादन करायला लागले आहेत.  दिवसभरात कधीही उदासी किंवा नैराश्येचे क्षण आले, तरी मला त्या आजोबांचा हसरा चेहरा आठवतो आणि  त्यांची आजारपणावर मात करण्याची विजिगिषु वृत्ती मनात चैतन्य भरण्यास मदत करते.

अशीच ऊर्जा मनात भरतात  ते उत्साही व्यायामपटू.  आजचे  'वर्कआउट समिट' गाठण्याचा प्रयत्नात एकाग्र होऊन घाम गाळताना रनर्स  किंवा सायकलिस्ट आजूबाजूस दिसत असतात. त्यांना समोर बघून, अवास्तव भीड मनात न बाळगता खिलाडूवृत्तीने  द्यावा  जरा उत्स्फुर्तपणे समोरच्याला एक लाईकचा अंगठा किंवा म्हणावे 'ग्रेट गोईंगss  ' ! असे करून कोणाचाही उत्साह वाढविल्यावर  त्यांचाही  व्यायामाचा जोम  तर वाढतोच शिवाय त्यांनी हसून आपल्याला दिलेल्या स्माईलमुळे आपल्यालाही ऊर्जा मिळते. त्यांच्यासारख्या आरोग्यवर्धक मार्गाने जाणायची प्रेरणा मिळते.   बस, आपण ओपन-अप होऊन दाद देण्याची वृत्ती जोपासायला हवी.     

नाक-कान-डोळे व्यवस्थितपणे उघडे ठवून चालल्यास निसर्गही आपल्या वेगवेगळ्या रूपांनी आपल्याला संजीवनी देतांना आपण अनुभवू शकतो.  जस्ट  ओपन देम ! कुठल्याही ऋतूत, विविध रंगी पाने-फुले-फळे  यांचे वैभव मिरविणारी झाडे, त्यावर बागडणारे विविध आवाजांचे  पक्षी यांकडे लक्ष्य जाण्यासाठी, मनातील रुटीन विचार झटकून , मनाची कवाडे उघडी ठेवायला हवीत. असे केल्यावर निसर्गाची ही रूपे मनात घर करून  रहातात. आम्हाला रोज एका झाडावर भारद्वाज दिसायचा. एके  दिवशी त्याचे नुकतेच उडायला लागलेले पिल्लूही त्याच्याबरोबर दिसल्यावर मन आनंदाने भरून गेले. एकदा एका  बंगल्याच्या आवारातील बागेत वेड्यासारखा फुललेल्या,  गुलाबी चाफा आणि सोनचाफा यांच्या एकत्रित सुगंधाने, मनाला एका नवीनच सुगंधी मखरात नेवून बसविले. कधी कोणा वॉकरच्या खिशातून ऐकू आलेली भन्नाट सुरावट, दिवसभर आपल्या मनात घुमत रहाते.

नाक-कान-डोळ्यांबरोबरच मनाची दारेही उघडी ठेवून, आपली ऊर्जा वाढविणारे हे रसग्रहण करायला  काय हरकत आहे? पण चित्र बरेचदा वेगळेच दिसते दिसते.  मोबाईल ऍप्पवर आपला आजचा वर्कआउट झळकवेपर्यंत  इतर कोणाकडे ढुंकूनही बघाण्याची फुरसत नसलेल्यांच्या, घरगुती गॉसिपमध्ये  किंवा विनाकारण गंभीरपणे, जमिनीकडे बघत रोजचा वॉक संपविणाऱ्यांच्या  बंद मनांना अशी चैतन्यदायी अनुभूती कशी बरी येणार? तेव्हा व्हा ओपन अप, रहा  ओपन अप !! दिलखुलासपणे दाद द्या, उत्साही  आवाजात अभिवादन करा, पॉझिटीव्ह उर्जेचे आदान-प्रदान करा, मन प्रयत्नपूर्वक जागृत ठेवून निसर्ग अनुभवा!! आपल्याच आजूबाजूस  कितीतरी अनामिक उर्जास्त्रोत वावरत असतात. खुल्या मनाने ती उर्जा भरभरून घेतल्यास प्रत्येक दिवसच 'ओ.पी. नय्यर' यांच्या गीतांसारखा हलका-फुलका ,उडत्या चालीचा नकीच होईल !! ओपन अप !!!


Wednesday, May 19, 2021

डिजीटल साहित्य संस्कृती

 

डिजीटल साहित्य संस्कृती


एका सर्वेक्षणानुसार, कोविडच्या कालावधीमध्ये  इंटरनेटचा वापर ४०% ते ६०% ने वाढला आहे !  ह्याला जसे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शाळा, कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन मिटींग्स, जनसामान्यांचे ऑनलाईन  शॉपिंग आणि  डिजीटल मनोरंजन कारणीभूत ठरले तसेच साहित्यप्रेमींचे ऑनलाइन वाचनही !!  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे, ज्या विविध क्षेत्रांवर कामकाजासंबंधात मर्यादा आल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे 'ग्रंथालये / वाचनालये'.  अर्थात जिज्ञासु, वाचनवेडे यावर उपाय न शोधते तरच नवल !  या साथीच्या कालावधीत,  २००४ साली सुरु झालेल्या ऍमेझॉनच्या किंडल पासून ते आजच्या स्टोरीटेल ऍपपर्यंत, विविध माध्यमांचा उपयोग करून घेत, वाचकांनी आपली साहित्यिक भुक भागवली !!  डिजीटल वाचन आणि साहित्य संस्कृतीचा आलेख चढता ठेवणाऱ्या काही माध्यमांविषयी आज जाणून घेऊयात !

ऍमेझॉन किंडल: या  प्रोजेक्टने  खऱ्या अर्थाने  'डिजीटल वाचन संस्कृती' उदयास आणली. त्याआधी ऑनलाईन वाचन हे बहुतांश करून वृत्तपत्रे आणि मोजक्या ब्लॉग्स पर्यंत सीमित होते.किंडल हे  हातात धरणेयोग्य, टॅबलेटसम डिव्हाईस आहे. किंडल बाजारात येताच  ई-वाचकांचा समुदाय झपाट्याने वाढीस लागला. किंडलने आधी मालिका (series) स्वरूपात ई-साहित्य उपलब्ध करून दिले त्यामुळे वाचकांची उत्कंठा वाढीस नेवून त्यांना या प्रोजेक्टकडे  आकर्षित करण्यात, ऍमेझॉन  कमालीचे यशस्वी ठरले ! आज किंडल स्टोअरवर  ई-पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके आणि इतर डिजिटल साहित्या संदर्भांत  ब्राउझ करणे, खरेदी करणे, डाउनलोड करणे आणि वाचने  असे बहुविध पर्याय उपलब्ध आहेत.  इन बिल्ट इंटरनेट सुविधा, चांगले बॅटरी लाईफ, खरे पुस्तक वाचल्याप्रमाणे अनुभव देणारी साहित्याची रचना, बुक मार्किंग, बहुविध भाषांमधील विशाल साहित्याची उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे किंडलची लोकप्रियता आजही टिकून आहे. साधारण अडीच हजारांपासून पुढील किंमतीत, किंडल उपलब्ध आहे.

स्टोरीटेल: ही जगभरात वापरली जाणारी ऑडिओ-बुक आणि ई-बुक सेवा आहे.  या ऍपवर   5,00,000 हून अधिक पुस्तके वाचणे आणि ऐकणे दोन्ही शक्य होते. याद्वारे इंग्रजी आणि इतर भाषांमधील आपल्या आवडत्या लेखकांच्या कथांचा आनंद वाचक आणि श्रोत्यांना मिळू शकतो. पुस्तकाचा आनंद घेताना, वापरकर्ता वाचन आणि ऐकणे या मोड्स दरम्यान  बदल करू शकतो तसेच वाचनाच्या वेग ऍडजस्ट करू शकतो.  कथा, कादंबरी, चरित्रकथा  यांच्याबाबत  आवडीनुसार शिफारशी मिळविणे, मुलांसाठी असणाऱ्या  'किड्स मोड' द्वारे मुलांनाही आवडेल असे साहित्य मिळविणे, कोठेही आनंद घेण्यासाठी ऑफलाइन डाउनलोड करणे आणि मुख्य म्हणजे गोष्टी ऐकण्याचा 'बेड टाइम' अनुभव घेता येणे यामुळे स्टोरीटेलचे वापरकर्ते दिवसेंगणिक वाढतच आहेत. सुरुवातीचे काही दिवस फी आणि नंतर साधारण ३०० रु प्रति महिना, असे  सभासदत्व स्टोरीटेलमार्फत देण्यात आलेले आहे.   मुक्ता बर्वे ,अमेय वाघ, संदीप खरे इ. प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या आवाजातुन साहित्य अनुभवायची संधी  स्टोरीटेलने दिलेली आहे.         

बहुविध: विविध डिजिटल माध्यमांवर उपलब्ध असलेलं सगळं साहित्य फुकटच असलं पाहिजे, या समजुतीला छेद देणारा पहिला मराठी प्रयत्न म्हणजे बहुविध.कॉम ! वर्षभरात हजारो  साहित्यप्रेमींनी याचे सशुल्क सभासदत्व घेऊन हा प्रयत्न सार्थ ठरवला आहे. सध्या विविध माध्यमांतून माहितीचा लोकांवर अक्षरशः भडिमार होत आहे. पण त्यातून दर्जेदार तेव्हढेच नेमके टिपून, ऊत्तम अभिरुची जोपासणाऱ्या वाचकांसमोर ठेवण्यात बहुविध यशस्वी ठरले आहे. मराठी भाषेतील जुन्या अप्रतिम लेखांना, नवीन रूप देऊन निवडक दिवाळी अंक, बालसाहित्य व इतर काही श्रेणीतील उत्तम साहित्य इथे उपलब्ध आहे. आशयघन साहित्याच्या शोधार्ध असणाऱ्या वाचकांचा वेळखाऊ, निरर्थक ब्राऊजिंग करण्याचा वेळ बहुविधमुळे नक्कीच वाचतो ! संकेतस्थळ : https://bahuvidh.com

ई-पुस्तकालय: गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणारे हे अँड्रॉइड ऍप ! इथे मराठी, हिंदी, संस्कृत तसेच बंगाली  भाषेतील विविध साहित्यप्रकार जसे ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, काव्य, बालसाहित्य इ. श्रेणीतील लोकप्रिय साहित्य उपलब्ध आहे. या ऍपचे वापरकर्ते, लेखकाचे नाव, शीर्षक, प्रकाशक आणि  कीवर्डवर आधारित साहित्य  शोधू शकतात. साहित्या संदर्भातील व्हिडिओ , डिओ क्लिप्स,  शैक्षणिक खेळ, डाउनलोड करण्यारखी पुस्तके यामुळे या ऍपला लोकप्रियता लाभलेली आहे.           

वाचकांच्या उपयुक्त ठरू शकतील अशी अजून काही डिजीटल माध्यमे / ऍप : ऑडिबल, पु. ल. देशपांडे कथाकथन, व, पु. काळे कथाकथन   साहित्यचिंतन.कॉम , ई-साहित्य.कॉम  आदी !     

कोरोना कालावधीत हाताशी मोकळा वेळ मिळाल्यास या माध्यमांचा वापर करून, वाचक   ' घरचेच सुरक्षित डिजीटल वाचनालय'  नक्कीच अनुभवु शकतात !      

 

डॉ. रुपाली कुलकर्णी,

ऍडजंक्ट प्रोफेसर  , संगणक विभाग 

का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय,

नासिक,      

   

     ९०११८९६६८१, rdkulkarni21@kkwagh.edu.in

 

Tuesday, May 18, 2021

करोना आणि रोजगार संधी

 


करोना आणि  रोजगार संधी

COVID -१९ अर्थात करोना विषाणू मुळे जगभर सुरु झालेल्या महामारीला तोंड देण्यासाठी भारतात २५ मार्च २०२० रोजी, २१ दिवसांचा पहिला लॉकडाउन जाहीर झाला. प्लेग सारख्या जीवघेण्या साथीचा काळ अनुभवलेली बुजुर्ग पिढी सोडली तर सगळ्यांच्याच  जीवनात ही अभूतपूर्व स्थिती पहिल्यांदाच उभी ठाकली. जीवनावश्यक सेवा वगळता रोजगार-व्यवसायाची सर्वच क्षेत्रे ठप्प पडली.  नोकरदार वर्ग असो की व्यावसायिक, रोजंदारीवर काम करणारा कष्टकरी वर्ग असो की घरेलू कामगार, 'काम बंद' संकटामुळे प्रत्येकाचेच धाबे दणाणले.  'पण हरकत नाही, जीवावर बेतणारे संकट आहे तर तीन आठवड्यांचा कालावधी विना-काम निभावून नेऊ' अशी मनाची समजूत काढूणाऱ्या प्रत्येकालाच तेव्हा यत्किंचितही कल्पना आली नाही की आरोग्यावरचे हे संकट, असे तीन महिन्यांचा कालावधी होऊन गेल्यावरही अजून 'जैसे थे' च आहे. सुरुवातीच्या कालावधीसाठी काही व्यावसायिकांना आर्थिक नुकसानाची झळ सोसूनही कामगारांना पूर्ण किंवा अर्धे वेतन देता आले. परंतु जसजसा लॉकडाउनचा कालावधी वाढतो आहे प्रत्येक वर्गाच्या आर्थिक नुकसानीचा आलेख वाढतच चाललेला आहे. त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच उद्योगक्षेत्रांमध्ये  कर्मचारी वर्गास  'तात्पुरता विना -वेतन ब्रेक' किंवा 'कॉस्ट कटींग' चा  भाग म्हणून नोकरीही गमविण्याची वेळ आलेली आहे. अशात ही परिस्थिती भविष्यात किती काळापुरती राहणार आहे हेही स्पष्ट नसल्याने बहुतांश  कुटुंब प्रमुखांद्वारे चरितार्थ चालविण्यासाठी,  उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतावरचे अवलंबित्व संपविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी  दुय्य्म उत्पन्नाच्या  अनेक मार्गांचा धांडोळा घेण्यास सुरुवात केलेली आहे. त्यावरच थोडासा उहापोह !  

सर्वप्रथम लॉकडाऊन मुळे कोणत्या घटकांवर किंवा त्यांच्या उप्लब्धतेवर मर्यादा आलेल्या आहेत त्याचा विचार करूयात म्हणजे मग या मर्यादा लक्षात घेऊन नवीन उद्योग क्षेत्राची / रोजगार संधीची निवड आणि त्यासाठी  नियोजन  करता येईल. यातील काही घटक म्हणजे  माल-वाहतुकीवरील अनिश्चितता  पर्यायाने मालाची अनुपलब्धतता / तुटवडा, कुशल कारागीर /मजूर यांची अनुपलब्धतता, प्रवास करण्यावर मर्यादा, सामाजिक सम्मेलन / एकत्रित येण्यावर मर्यादा, संचारबंदीच्या वेळा, परिस्थितीमुळे लोप पावलेल्या सुविधा अथवा उत्पन्न संधी इ. या बाबी लक्षात घेतल्या  तर  आपण निवड करायच्या  नवीन उद्योग क्षेत्रामध्ये  कुठले उप्त्पादन घेता येईल  किंवा कुठल्या प्रकारच्या सेवा पुरविता येतील हे  ठरविणे सोपे जाईल.  हे ठरवितांना तुमच्या  स्वतःच्या आवडी/रस (Interests), अंगभुत गुणकौश्यले (Skillsets), तुमच्याकडे उपलब्ध पायाभूत सुविधा-Infrastructure (जागा, वीज, पाणी इ.)  लक्षात घेणेही तितकेच महत्वाचे आहे.  आता  वरील घटकांचा आणि संभाव्य ग्राहकवर्गाचा ताळमेळ बसविण्यासाठीप्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे विचार करून  काही रोजगार संधी शोधता येतेय का ते बघुयात.

१)  घटक: घटक: प्रवास करण्यावर मर्यादा, सामाजिक सम्मेलन / एकत्रित येण्यावर मर्यादा : या घटकाचा विचार केल्यास, अशा सेवेचा किंवा सुविधेचा विचार करा ज्याचा लाभ  संभाव्य ग्राहकवर्ग घरबसल्या घेऊ शकेल. उदाहरणार्थ ऑनलाईन शिक्षण/मागर्दर्शन ! पहिल्या लॉकडाऊन पासून, आता तीन महिने झाले आहेत आणि    शाळा, महाविद्यालये बंद आहेत. जुलै महिन्याची सुरुवात म्हणजे पुढचे शैक्षणिक वर्षही चालू झाले आहे. तेव्हा घरी बसूनच विद्यार्थ्यांचा पुढील आभ्यास सुरु झाला आहे. जर तुमच्याकडे एखाद्या विषयाचे सुयोग्य ज्ञान असेल आणि  ऑनलाईन शिकविण्यासाठी आवश्यक ती साधने, कौश्यले असतील तर  ऑनलाईन ट्युशन्सचा या सेवेचा मार्ग उत्तम ठरतो. बैजू, अन-अकॅडेमी सारख्या स्टार्टअप्सना आज किती यश लाभले आहे ते आपल्याला विदित आहेच. या यशामागे त्यांच्या तज्ञ् शिक्षकवर्ग आणि प्रभावी प्रेझेन्टशन पद्धती काम करते. शिवाय अशा प्रकारची सेवा पुरविताना विषयाचे बंधन रहात नाही. तांत्रिक विषयांपासून ते कला क्षेत्रापर्यंत शिक्षणास ऑनलाईन घेण्यास मागणी असणार आहे. तांत्रिक विषयां अंतर्गत शैक्षणिक विषय, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, संशोधन मार्गदर्शन,  विशेष  अभ्यासक्रम जसे शेअर मार्केट, विमा/ अर्थ सल्लागार, डिजिटल मार्केटींग आदी सारख्या विषयांचा अंतर्भाव होईल. परदेशांप्रमाणेच वाद्यसंगीत, नृत्य, पाककला, हस्त/ चित्रकला या सारख्या कलांचे शिक्षणही ऑनलाईन देता येईल. तुमच्या ऑनलाईन शिक्षणक्रमाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी 'सोशल मीडिया'/'डिजिटल मार्केटिंग' चा अवलंब करता येईल.    

२) घटक: परिस्थितीमुळे लोप पावलेल्या सुविधा: लॉकडाऊन मध्ये मेस, हॉटेल्स या सुविधांवर गंडांतर आले आणि  बाहेरगावी राहणारे नोकरदार, विद्यार्थी यांच्या उदरभरणावर संकट उभे राहिले. हेच कशाला गेल्या तीन महिन्यांमध्ये, घरेलू कामगार वर्गाच्या अनुपस्थितीत आणि घरात सदासर्वकाळ उपस्थित (अतिरिक्त) माणसांमुळे घरच्या अन्नपूर्णेचा स्वयंपाका-कामामुळे पिट्ट्या पडलेला आहे. अशावेळी घरगुती निगुतीने बनविलेल्या चविष्ट, सात्विक अन्नास मागणी वाढलेली आहे. जर तुमच्याकडे उत्तम पाक कौशल्य, व्हाट्ससप्प किंवा तत्सम मार्केटींग कला आणि भरपूर माणसांचे नेटवर्क असेल तर पार्सल-फूड आउटलेट चालविणे हा ही एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ओळखीच्या व्यक्तीकडे स्वयंपाका-कामामध्ये जपली जाणारी स्वच्छता आणि हातची रुची ज्ञात असल्याने अशा व्यक्तींना जर रुचीपूर्ण खाद्यपदार्थ पुरविता आले तर थोड्या कालावधीत या व्यवसायाची चांगली ओळख निर्माण होते असा अनुभव आहे. घरगुती साठवणुकीचे पदार्थ जसे मसाले, पापड,लोणची, खाकरे, बेकरीचे पदार्थ, आईसक्रीम, केक अशा एक किंवा अनेक वस्तू वस्तूंचे विशेष आउटलेट चालविता येईल.            

३) घटक: परिस्थितीजन्य उत्पन्न संधी: असे म्हणतात की खरा व्यावसायिक मंदीतही संधी शोधू शकतो. देश पुढील काही काळ हा आर्थिक मंदीतून जात असताना त्यावर मात करण्यासाठी नवनवीन उत्पादने आणि सेवा यांचा उदय होण्याचा हा काळ आहे. नोकरी व्यवसायातील अनिश्चितता, भविष्यात उभ्या असलेल्या आर्थिक विवंचना यामुळे  मानसिकरीत्या खंबीर नसलेले लोक निराशेच्या गर्तेत ढकलले जात आहेत. वाढते नैराश्य, आत्महत्यांचे प्रमाण बघता  ऑनलाइन समुपदेशन करणाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. लोकांचे मनोधैर्य वाढविणे, प्राप्त परिस्थितीतून त्यांना योग्य मार्ग दाखविणे असे समुपदेशन करणेही महत्त्वाचे ठरणार आहे. परिस्थितीमुळे व्यायामशाळा, जॉगिंग पार्क हे बंद असल्याने ऑनलाइन योगासने वर्ग, मेडिटेशन वर्ग, मुद्रा-अभ्यास वर्ग  यांनाही चांगली प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.  ज्यांच्याकडे ही अंगभूत कौशल्ये आहेत ते  या मंदीतही त्याचे रूपांतर रोजगार संधीमध्ये करू शकतात. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये घरातून न बाहेर पडण्याच्या सूचना प्रशासनामार्फत जाहीर होत असतात. तसेच घरातल्या सदस्यांच्या आरोग्याची चिंताही गृहिणीला भेडसावत असते. अशावेळी घरपोच भाजीपाला व किराणा-माल पोहोचवणाऱ्या सेवा सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेतला जातो. त्यात नावीन्य आणून (जसे निवडलेला भाजीपाला, पूजेसाठी फुले, स्टेशनरी वस्तू इ.) घरपोच ग्रोसरी सेवेचा संधी म्हणून विचार करता येईल. थोडा ‘आउट ऑफ बॉक्स’ विचार करुन  लॉकडाऊन मुळे घरात अडकून पडलेल्या सर्व वयोगटातील सदस्यांना काही नाविन्यपूर्ण सेवा पुरविता येवू शकते. उदाहरणार्थ  ज्येष्ठांसाठी ‘वाचनालय तुमच्या दारी’ सेवा, ‘घरपोच औषधे पुरवठा’ सेवा,  लहान मुलांसाठी ‘हस्तकला/मूर्तीकला कीट’ निर्मिती व सेवा, गृहिणींसाठी ‘घरगुती ब्युटीपार्लर सेवा’, मास्क शिलाई, सेनिटायझार निर्मिती’,  इ. संधी शोधू तितक्या सापडतील !                                      

 ४) घटक: मालाची अनुपलब्धतता / तुटवडा: हा घटक विचारात घेतला तर त्याला थोडी नियोजनाची जोड झाली द्यावी लागेल. साथीमुळे निर्बंध वाढले तर बरेचसे शेतकी उत्पादन  वाया जाऊ शकते. जसे या वर्षी आंब्यांची आवक  भरपूर होती परंतु विक्री करते वेळी संचारबंदी लागू झाल्याने हव्या त्या प्रमाणात विक्री होऊ शकली नाही.  आणि म्हणून  प्रक्रिया व शीत-साठवणूक उद्योग यांमध्ये संधी शोधता येईल. उदाहरणार्थ, आमरस हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ सर्व ऋतूत उपलब्ध व्हावा म्हणून त्यावर प्रक्रिया करुन त्याची साठवणूक करणे व मागणीनुसार पुरवठा करणे. भविष्यातील विविध वस्तूंचा मागणी व पुरवठा लक्षात घेऊन प्रक्रिया व साठवणूक उद्योगास चालना मिळू शकते.

अर्थात हे सगळे झाले मध्यमवर्गीय नोकरदार किंवा व्यावसायिक यांविषयी. पण ज्यांचे हातावर पोट आहे असे मजूर,घरेलू कामगार त्यांनाही अशा काही निश्चित वाटा शोधण्यासाठी मदत करायला पाहिजे.

अशाप्रकारे ‘मंदीतही संधी’ शोधता येईल. त्यासाठी गरज आहे ती पुरेसा आत्मविश्वास, अंगभूत कौशल्यांना योग्य दिशा देण्याची इच्छाशक्ती, थोडीशी कल्पकता आणि  नाविन्याची, तंत्राज्ञानाची जोड देण्याची कला !! काय सांगता यावे, कदाचित अपरिहार्य म्हणून स्वीकारलेला रोजगार मार्ग तुमच्या जीवनाला नवीन, भक्कम  कलाटणी देवू शकेल! करा विचार, लागा कामाला !! Best Luck !!

 

- डॉ. रुपाली कुलकर्णी,

  ट्रेनिंग हेड

SWS Financial Solutions Pvt. Ltd.

muktangan@swsfspl.com

९०११८९६६८१


SWS अर्थवाणी - चरण २: आयुर्विमा (Insurance)SWS अर्थवाणी - चरण २: आयुर्विमा (Insurance)


जो वाही उत्पन्नाचा भार 💰

त्याने करावा आयुर्विमा  स्वीकार,🪂

जीवनांती जो बने आधार,😇

कुटुंबियास ll १  ll 👨‍👩‍👧‍👧


जैसी उत्पन्नाची सीमा, 💹

त्यायोगे घ्यावा विमा, ❎

आर्थिक आघात करावा  धीमा, 😊

या मार्गे ll २  ll 🪂


दायित्वे वाढता जीवनात, 👶🏻👧🏻

वाढ करावी संरक्षणात,😎

अतिरिक्त लाभ प्राप्तीकरात,💰

नियोजने  ll ३ ll 🎯


भरावा हफ्ता वेळेवार,⏳

टाळावा संभाव्य अधिभार, 💵

नेमता सुयोग्य सल्लागार,😎

चिंता मिटे ll ४  ll 😇


करिता विमा कवच धारण, 🪂

अर्थसंकटा न जीवन शरण, 👨‍👩‍👧‍👧

चिंतेचे मिटते कारण 😇

SWS वाणी ll ५ ll 💰

  - --  रुपाली 

SWS अर्थवाणी - चरण १: मालमत्ता नियोजन (Estate Panning)

 


SWS अर्थवाणी - चरण १: मालमत्ता नियोजन (Estate Panning)

होता जीवनाचा आरंभ I👶🏻 

निश्चित होतसे  अंत I ✝️

करावा तो सुखांत I 🆓

विवेकबुद्धे II १  II  😇


धनसंपदा, गृह ,भूप्रदेश I 💰

विभागून द्यावा विना क्लेशI 🔡

वाद-विवाद ना उरो शेष I 🤬 

नियोजने II २  II 📝 


वाटता क्लिष्टता फार I 🙁

नेमावा योग्य सल्लागार I 😎 

नियोजना जो देई आकार I 😊 

तुमच्या इच्छे II ३  II 🤗


असावे असे नियोजन I 📝 

उपभोग घेतील प्रियजन I 👨‍👩‍👦‍👦

करा समाजासाठी ही दान I💝

SWS अर्थवाणी II  II 😀

 

    - -- रुपाली 


तिचे अर्थभान ...तिचे अर्थभान ...

तिच्या अर्थभानावर बोलण्याआधी, आपल्या आजुबाजूला घडणारे 'अर्था'शी  निगडीत काही प्रसंग आधी पाहुयात. समजा,  श्री.  चिंतामणी आपल्या कुटुंबासाठी काही आर्थिक गुंतवणूक करतात किंवा करणार आहेत. अशावेळी घरातील सौ.चिंतामणींशी ते कसे संवाद साधतात ते पाहुयात. 

प्रसंग १:  शून्य  संवाद ! सौ.चिंतामणींना आपल्या आर्थिक गुंतवणूकीविषयी  घरात माहिती देण्यास अजिबात आवडत नाही किंवा तसे करण्याची त्यांना आवश्यकताही वाटत नाही.  

प्रसंग २:  श्री. चिंतामणी आपल्या आर्थिक गुंतवणूकीविषयी  केवळ इन्फॉर्मेशन म्हणून घरात शेअर बोलतात. त्यामागील उद्देश  काय  आहे  किंवा  इतर माहितीची चर्चा ते घरात करत नाहीत.  सौ.चिंतामणींनाही  त्याबाबतीत  कळत नसल्याने त्यांनाही अशी माहिती ऐकण्यात रस वाटत नाही.  त्यांची प्रतिक्रिया 'हं' यापलीकडे जात नाही.

प्रसंग ३. : श्री.  चिंतामणी आपल्या  आर्थिक गुंतवणूकीविषयी  घरात उत्साहाने  सांगतात. त्यावर  सौ. चिंतामणी  सर्व माहिती ऐकून तर घेतात पण  'मला कशाला हवी ही सगळी माहिती ? तुम्ही बघताय ना सगळं व्यवस्थित ? ठीक तर मग!' अशी अंगकाढू प्रतिक्रिया देतात.   

प्रसंग ४: श्री. चिंतामणी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी  सौ.चिंतामणींबरोबर  सल्लामसलत करतात. आणि त्यांचेही मत ग्राह्य धरतात.

घरातील आर्थिक निर्णय असू देत नाहीतर चर्चा, आपल्या आजूबाजूला घडणारे हे आणि इतर अनेक 'अर्थ'पूर्ण असे प्रसंग पाहिल्यानंतर हे खचितच मनात येते की 'घरातील स्त्रियांची, कुटुंबासंबंधित घेतल्या जाणाऱ्या आर्थिक निर्णयांबाबत/ नियोजनामध्ये  नक्की  काय भूमिका असते ? आधुनिक जगातील स्त्री वर्गाला पुरेसे अर्थभान आहे का?' घरातील स्त्री, मग ती स्वतंत्रपणे कमाविती असू देत किंवा नाही, तिचे घरातील आर्थिक निर्णयांबाबतचे मत अगदीच मोजक्याच घरांमध्ये (प्रसंग ४ प्रमाणे) जमेस  धरले जाते. याला कारण ठरते स्त्रीचे 'अर्थभान' !  वरील पहिल्या तीन  प्रसंगाची जरा कारणमीमांसा करूयात.

 

 प्रसंग १:  आर्थिक गुंतवणूक किंवा निर्णयांविषयी  पती-पत्नी दरम्यान शून्य  संवाद ! याची अनेक कारणे असू शकतात. आजच्या तथाकथित 'स्त्री -पुरुष' समानतेच्या काळातही बऱ्याच घरांमध्ये,  कुटुंबासंबंधित आर्थिक निर्णयांबाबत 'गोपनीयता' राखली जाते. जिथे पत्नी आपल्या पतीच्या बरोबरीने संसाराचा आर्थिक रथ ओढत असते तिथेही असे चित्र दिसते तर गृहिणी असणाऱ्या पत्नीच्या बाबतीत तर काय कथा (आणि व्यथा) असणार? अशा प्रसंगात  पती-पत्नीच्या नात्यात  परस्पर विश्वास, सामंजस्य यांचा अभाव असल्याचे दिसते. कधी स्वभावातील काही गुणदोषांमुळे म्हणा किंवा त्यांच्या भोवतालच्या विशेष सलगीच्या लोकांमुळे म्हणा, घरासंबंधित  आर्थिक निर्णयांची वाच्यता  करणे बरेच जण हेतुपुरस्सर टाळताना दिसतात.  काही कुटुंब प्रमुखांच्या बाबतीत पुरेशी आर्थिक साक्षरता नसल्याने किंवा  बेफिकीर वृत्ती असल्याने,  घरात कुटुंबाच्या आर्थिक भवितव्याशी निगडीत असणारी माहिती न दिल्याने कुटुंबाला काय परिणामांना सामोरे जावे लागू शकते याचे पुरेसे गांभीर्यच आलेले  नसते. हे समजावून घेण्यासाठी एक उदाहरण पाहुयात. आमच्याच कॉलनीमध्ये राहणारा अतुल. अतुलने दोन-चार व्यवसायांसाठी कर्जे काढलेली होती. त्या सर्व व्यवसायांमध्ये त्याला अपयश आले. मग झालेली उधारी चुकविण्यासाठी आपल्या मित्रवर्गाकडून, काही संस्थांकडून  त्याने आणखी कर्जे घेतली. आपल्या  घरात अर्थातच अशा व्यवहारांची  माहिती तो कधीच देत नसे. दुर्दैवाने, एका अपघातात अतुलचा स्वर्गवास झाला. मानसिक धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तर लगेचच अतुलने ज्या-ज्या संस्थांकडून/मित्रांकडून  कर्जे घेतली होती त्या त्या संस्थांचे अधिकारी तसेच  घरात कधीही माहित नसणारे मित्र, पैशांची मागणी करण्यासाठी  दारात येऊन उभे राहिले. अतुलच्या आर्थिक-व्यवहारांबाबत अनभिद्न्य असणाऱ्या त्याच्या घरच्यांना विशेषतः पत्नी मानसीला हे आर्थिक धक्केही  सहन करावे लागले ! पतीच्या पश्चात वृद्ध सासू -सासरे आणि लहान मुले यांच्या आर्थिक भवितव्याबाबत सचिंत असणाऱ्या मानसीचा या सर्व विवंचनांतून बाहेर पडता पडता अगदीच पिट्ट्या पडला. मानसीच्या या अनुभवातून बोध काय घ्यायचा तर अशा अनपेक्षित आर्थिक अडचणी, आपल्या कुटुंबीयांसमोर  कधी उभ्या राहू नयेत  नयेत  यासाठी कुटुंबातील हर एक व्यक्तीने आपल्या आर्थिक व्यवहारांची माहिती घरात वेळोवेळी दिली पाहिजे. घरातल्या स्त्रीनेही जबाबदारीपूर्वक सर्व आर्थिक व्यवहार जाणून घ्यावयास हवे आणि योग्य ठिकाणीच आपल्या घरातील पैसा वापरला जात आहे ना याबाबतीत दक्ष राहायला हवे. नाहीतर परिस्थितीचे आर्थिक चटके संपूर्ण कुटुंबालाच बसू शकतात हे या उदाहरणावरून स्पष्ट होते.       

 

प्रसंग २: काही घरामध्ये आपल्या आर्थिक व्यवहारांबाबत केवळ ‘इन्फॉर्मेशन’ स्वरुपात बोलले जाते. यात घरातील स्त्रीला आर्थिक व्यवहारांबाबत  काहीही गंध नसल्याने किंवा त्यात रस नसल्याने केवळ वरवरची माहिती म्हणून क्वचितच, कधीतरी सांगितले जाते.

इथे मात्र आर्थिक बाबींबाबत स्त्री-वर्गाची असणारी अनास्थाच अडचणींना कारणीभूत ठरते. समजून घेण्यासाठी कविताचे उदाहरण घेऊ. कविताला तिचा नवरा आशिष, घरासाठी केलेल्या आर्थिक तरतूदींबाबत  सुरुवातीला माहिती द्यायचा. पण  कविताला त्यातले फारसे कळत नाही हे लक्षात आल्यावर मात्र तिला त्याबाबत साक्षर करण्याऐवजी  त्याने आपल्या भावाला, प्रकाशला सर्व माहिती द्यायला सुरुवात केली.  आशिषकडून प्रकाशने  सर्व माहिती मिळविल्यावर प्रकाशने त्याला सल्ला द्यायला, गुंतवणुकीत फेरफार करायला सुरुवात केली. आशिषच्या दुर्दैवी निधनानंतर मात्र प्रकाशने कविताच्या नकळत तिच्या कुटुंबाकरिता नियोजलेली  बरीचशी संपत्ती स्वतःच लाटली. या कविताच्या कथेवरून काय दिसते तर आपल्याला अशा माध्यमांचे पुरेसे ज्ञान नाही हे वास्तवाला  'आता वेळ नाही' किंवा 'इतर कामे काय कमी आहेत' अशा सबबी सॊयीस्कररित्या पुढे करुन, स्त्रिया दूर ठेवू पाहतात. आर्थिक बाबींमध्ये सहभागी होण्याच्या संधीला त्या आळसापोटी, अज्ञानापोटी वेळोवेळी दवडतात. 'म्युचुअल फंड्स' , 'टॅक्स रिटर्न्स', 'लोन रिपेमेंट ऑप्शन्स'  इ. सारखे शब्द नुसते ऐकले तरी 'ते सगळे आमच्या ह्यांच्याशी बोला' असा आपल्या 'ह्यां'च्याकडे अंगुलीनिर्देश करून स्त्रीवर्ग  स्वतःची सुटका करून घेतो. खूपच कमी स्त्रिया अशा सर्व बाबी स्वतंत्रपणे हाताळतांना दिसतात. केव्हाही, कुठल्याही आर्थिक विवंचनेस, अनपेक्षीतरित्या  सामोरे जावे लागू शकते ह्याची जाणीव ठेवून प्रत्येक स्त्री ने आर्थिक बाबतीतही आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व आर्थिक योजनांचा, गुंतवणूक माध्यमांचा बारकाईने अभ्यास करण्याची वृत्ती जोपासण्याची आवश्यकता आहे.

प्रसंग ३: काही घरामध्ये कर्ता पुरुषवर्ग दक्षपणे आपल्या आर्धांगिनीला आपल्या कुटुंबास्तव केलेले  आर्थिक नियोजन समजावून सांगण्यासाठी आग्रही असणारा दिसतो. वरकरणी हे चित्र चांगले असले तरी अशा शेअरिंगमध्ये क्वचितच काही स्त्रिया जबाबदारीने सहभाग घेताना दिसतात. बहुंतांश स्त्रीवर्ग जोडीदारावर सर्व आर्थिक निर्णय सोपवून आर्थिक नियोजनातील आपली भूमिका अगदीच नगण्य करून घेतात. घरातील कर्त्यावर असणारा आर्थिक-विश्वास ही चांगलीच गोष्ट आहे मात्र असा विश्वास अनाठायीही असू नये हे कविताच्या उदाहरणातून समोर येते. आपला पेहराव, वागणे-बोलणे, घराचा चेहरा-मोहरा 'अप टू डेट' ठेवणारी स्त्री, तिच्या आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत मात्र  'आउट-ऑफ-डेट' दिसून येते. आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल-मीडियाला  चुटकी(की बोटां)सरशी हाताळणारी स्त्री आर्थिक-निर्णय घेण्याच्या  बाबतीत मात्र  परावलंबीच आहे असे चित्र दिसते.आपल्या कुटुंबाकरिता कुठले आर्थिक निर्णय घेतले जातात आणि घ्यायला पाहिजे यावर स्त्रीलाही आपले स्वतंत्र, अभ्यासपूर्ण मत मांडता आले पाहिजे. आजकाल दरदिवशी तंत्रज्ञानाच्या बरोबरीने आर्थिक क्षेत्रातही बरेच बदल सुरु असतात. ते माहीत करून घेण्यासाठी तंत्रज्ञानही घरात दरडोई (दर हातात !) उपलब्ध असते, तेव्हा मनोरंजनाबरोबरच  आपल्या ज्ञानाच्या  कक्षाही त्यामुळे विस्तारता येतील का याचाही विचार आणि अंमल होणे गरजेचे आहे.

 

वरील प्रसंग आणि उदाहरणे  यातून आजच्या स्त्री वर्गाच्या आर्थिक साक्षरतेवर, दिसणाऱ्या अर्थाभानावर पुरेसा प्रकाश पडतो आहे. जेव्हा प्रत्येक स्त्री, स्वतः हुन, कौटुंबिक जबाबदारीच्या जाणिवेतुन आपल्या आर्थिक साक्षरतेच्या, स्वतंत्रतेच्या बाबतीत पुढचे पाऊल टाकू शकेल तेव्हा स्वतःच्या आणि पर्यायाने सर्वच कुटुंबियांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ती उभी राहू शकेल. स्वतःच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, सुयोग्य अर्थभान मिळविण्यासाठी प्रत्येकीनेच जाणीवपूर्वक प्रयत्न करायलाच हवे.  तसे झाल्यास  प्रसंग ४ घरोघरी घडतांना दिसतील, नाही का ?

जाता जाता आपली आर्थिक साक्षरता वृद्धिंगत करण्यासाठी पुढील चेकलिस्ट देत आहे. ती स्वतःसाठी पडताळून पहा आणि त्यातील संदर्भांची माहिती करून घ्या !

           मी  आर्थिक सर्व-समावेशकतेसाठी सरकार तर्फे जाहीर करण्यात आलेल्या उपयुक्त आर्थिक  योजनांमध्ये  सहभागी झालेले  आहे का ? (उदा. पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना)

           मला  विम्याचे सर्व प्रकार, त्यांचे फायदे ठाऊक आहेत का? माझ्या सर्व कुटुंबियासाठी  अशा  उपाययोजना केलेल्या  आहेत  किवा नाही याची मला माहिती आहे का ? (उदा. आरोग्य / अपघात विमा)

           मला आर्थिक गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची पुरेशी माहिती आहे का ? (उदा. म्युचुअल फंड्स).  मी अशी गुंतणवूक माध्यमे हाताळण्यासाठी पुरेशी सक्षम आहे का?

           मला सोप्या आर्थिक संकल्पना आणि त्यांचे फायदे/ तोटे माहिती आहेत का ? (उदा. इन्फ्लेशन). मी त्यांचा वापर आपल्या कुटुंबाच्या आर्थिक नियोजनासाठी करते का ?

           मला माझ्या घरातील सर्व आर्थिक गुंतवणुकीचा लेखा-जोखा ज्ञात आहे का? त्यासाठी  घरातील सर्व  आर्थिक व्यवहारांची,  निर्णयांची नोंद मी ठेवते का ?

           मी माझ्या घरातील कळत्या वयातील मुलांवर आर्थिक संस्कार देखील  करण्यास सक्षम आहे का?  त्यासाठी अद्ययावत असे ज्ञान माझ्याजवळ आहे का ?

           मी वर्तमानपत्रातील आर्थिक-क्षेत्रातील बातम्या, पुरवणी वाचते का?  आर्थिक-क्षेत्राशी निगडीत पुस्तके, ब्लॉग, कार्यक्रम यांचा वापर, मी माझ्या ज्ञानवृद्धी साठी  करते का?

मैत्रिणिनो, करा विचार, करा अंमल  ! जागवा स्वतःचे अर्थभान ! तुमच्यासाठी ... तुमच्या लाडक्या  कुटुंबियांसाठी !!