Menu

Tuesday, March 28, 2023

ChatGPT आहे मनोहर तरीही ...

 


मानवी मेंदूची बुद्धीमत्ता आणि आर्टिफिशल  इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रीम  बुद्धीमत्ता यांची तुलना केली असता  मानवी बुद्धीमत्तेचे पारडे नेहेमीच  वरचढ असलेले आपण पहात आलो आहोत. शेवटी कृत्रीम बुद्धीमत्तेला जन्म मानवी मेंदूनेच तर दिला आहे !  परंतु,  ३० नोव्हेंबर २०२२ रोजी, पूर्वी इलॉन मस्क  यांच्या मालकीच्या असणाऱ्या OpenAI या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संशोधन कंपनीने ChatGPT या प्रणालीला जगासमोर ठेवले आणि आणि कृत्रीम  बुद्धीमत्तेला झुकते माप पडते की काय अशी परिस्थती निर्माण झाली !!

खरे पाहता ChatGPT ही AI वर आधारित टेक्स्ट-चॅटबॉट आहे, भारतातही बँकिंग, ट्रॅव्हल्स, टेलिकॉम इ. क्षेत्रांत, ग्राहकांना  काही ठराविक सेवा पुरविणाऱ्या चॅटबॉट आपण पाहतो ज्या टेक्स्ट किंवा व्होईस कमांडद्वारे दिलेल्या प्रश्नांची, त्या त्या  संस्थेच्या वतीने उत्तरे देतात. तशीच पण कुठल्याही एका क्षेत्राशी मर्यादित नसणारी किंवा सर्वज्ञानीच असणारी ही ChatGPT !!  तुम्ही तिला कोणतेही प्रश्न टेक्स्ट म्हणजे लिखित स्वरूपात विचारा आणि ही  प्रणाली तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे टेक्स्ट स्वरुपात देते. बरे मिळणारी उत्तरे इतकी संयुक्तिक आणि परिपूर्ण असतात की जणुकाही तुम्ही तुमच्या एखाद्या तज्ञ्, परिचित मित्राबरोबरच संभाषण करत असल्यासारखा अनुभव तुम्हाला येतो !  तुमचे प्रश्नही कितीतरी वेगवगळ्या स्वरुपाचे असू देत जसे की एखाद्या विषयासंबंधित माहिती किंवा सारग्रहण ! काव्य  किंवा कथा ! विनोद किंवा भाषांतर, कोडिंग किंवा प्रोग्रॅम्स.  तुम्ही बस ChatGPT ला तुमचा हेतू किंवा अडचण योग्य शब्दात सांगा आणि तिचे उत्तर  ChatGPT तुमच्यासमोर हजर करते !! 

याचा परिणाम म्हणून इतक्यादिवस गुगल कडून मिळालेल्या 'माहिती'वर निर्भर असणारी सारी टेक्नोसॅव्ही  गुगल-पंडित  जनता आता ChatGPT द्वारे सादर होणारे  'ज्ञान' ग्रहण करते आहे !!  तेही मोफत, चुटकीसरशी, हवे  तेव्हा, हवे त्या भाषेत आणि हवे त्या स्वरूपात !! यामुळे आठवड्याभरात साधारणपणे लाखापेक्षा जास्त वापरकर्ते ChatGPT कडे वळताहेत !! यात नोकरदार, व्यवसायिक आणि अगदी विद्यार्थीही  आघडीवर आहेत !! म्हणजे ChatGPT ची कृत्रीम  बुद्धीमत्ता या सर्व व्यवसाय अथवा नोकरी-पेशांवर गदा आणते की काय अशी परिस्थती निर्माण होते आहे आहे ! उदाहरणार्थ ChatGPT द्वारे  स्टेनो   योग्य तो मजकुर लिहून घेत आहेत, व्यावसायिक त्याचा व्यवसाय कसा वृद्धिंगत करावा यावर सल्ला घेत आहेत , शिक्षक एखाद्या विषयावरची प्रशपत्रिका तयार करून घेत आहेत तर  विद्यार्थी एखाद्या संकल्पेनवर निबंध उतरवत आहेत !!

अशी सगळीच कामे  ChatGPT द्वारे होत असताना कौशल्यप्रधान आणि गुणीभूत माणसाची मला खरोखरच सल्लागाराची गरज आहे का असा व्यावसायिकपणे  विचार व्हायला लागला आहे !! अनेक क्षेत्रे, नोकऱ्या यांवर गंडांतर येण्यास सुरुवात झालेलीच आहे !!  ChatGPT च्या अफलातून संशोधनाला 'भीती, धमकी" अशा विशेषणांबरोबरही जोडले जाऊ लागले आहे ! आणि तेव्हाच  सुद्न्य माणसाला प्रश्नही पडतो आहे की या मनोहर दिसणाऱ्या वर्तमानानंतर येणारा भविष्यकाळ कसा बरे असेल ?

माणसाची अभ्यासू वृत्ती, विचार करण्याची सवय, मेंदूला ताण देऊन विश्लेषण करण्याची क्षमता यांवर ChatGPT आघात करते आहे का ? जेव्हा 'अमका विषय मला १०० शब्दात समजावून सांग' अशा स्वरूपाच्या प्रश्नांना ChatGPT चपखल आणि संयुक्तिक  उत्तर देते आहे तेव्हा वर्तमान पिढी एखाद्या विषयाच्या मूळापर्यत जाऊन तो विषय अभ्यासेल का ? जर 'मला तमक्या विषयावर दोन पानाचा निबंध लिहून दे' अशा  आज्ञेला शिरसावंद्य मानून ChatGPT योग्य ते ज्ञान  समोर मांडते आहे तर विद्यार्थी, संबंधित विषयावरची  पुस्तके वाचतील का ? थोडकाय काय तर  कृत्रिम मेंदूचा होणारा वाढता वापर हा मानवी मेंदूला गंज लावतो आहे ! भारतीय बुद्धिमत्तेला जगभरातुन मागणी असण्याचे कारण म्हणजे भारतीयांची  तल्लखता !! या अभिनित तल्लखतेवर, सृजनशीलतेवर, मनोव्यापारावर  परकीय तंत्रज्ञानाचे वाढते आक्रमण धोकादायकच आहे !! सगळ्यांनीच  या तंत्रज्ञानाचा वापर नियंत्रित, मर्यदित , समतोल साधूनच करावयास हवा.   म्हणूनच, वर्ममान आहे मनोहर तरीही , "सावध ऐका पुढच्या हाका आणि तंत्रज्ञान वापराचा समतोल राखा !!"       

2 comments: