Thursday, May 27, 2021

ओपन-अप !!

आज नेहेमीप्रमाणे प्रसन्न अशा सकाळीचे आगमन झाले. विविध पक्ष्यांचे मंजुळ प्रभातगान कानी पडताच, उठून  सकाळच्या  फिरायला जाण्यासाठी तयार होत होते.  परंतु पूर्ण रात्र गेली तरीही,  काल ऑफिसमध्ये घडलेल्या वादविवादाचे विचार डोक्यात पुनः डोकावले आणि मनावर परत  उदासीचे  मळभ दाटले. तरिही, बाहेर पडल्यावर बरे वाटेल म्हणून मी नवरोबांच्या मागे गुमान चालू लागले. तेव्हा मनात  विचार डोकावला की आपल्या स्वतःच्याच मनाला असे 'गार्बेज ट्र्क' बनविण्यापेक्षा जरा बाहेरच्या वातावरणाशी ओपन-अप होऊन बघुयात , समरस होण्याचा प्रयत्न करूयात  ! आणि माझ्या प्रयत्नांना यश आले ! मॉर्निंग वॉकला जातांना 'सैगल मुड' मध्ये असणारी मी, येतांना मात्र 'ओ.पी. नय्यर' मुडमध्ये घरात प्रवेशती झाले. आणि त्या दिवशीच्या शारिरीक व्यायामाच्या वेळेत जो मनाचा 'ओपन-अप' व्यायाम केला होता तो आता 'सैगल मुड' चा जराही  सुगावा लागताच  प्रयत्नपूर्वक करणे चालू केले आहे. मनावर पोझीटीव्हीटीची मोहिनी घालणाऱ्या अशा क्षणांनी तेव्हापासून  मॉर्निंग वॉकची आणि पर्यायाने त्यांनतर जाणाऱ्या दिवसभराच्या  प्रसन्नतेत चांगलीच भर घातली आहे. सकाळी - सकाळी खुल्या मनाने, हृदयाने शरीरात  उत्साह,ऊर्जा  भरून घेतली  तर त्यापुढे  येऊ घातलेला  दिवस हा एक सुंदर दिवस बनण्याची शक्यता  कितीतरी पटीने वाढते !  या माझ्या  'ओपन-अप'  अनुभवाविषयी  थोडेसे ...

दररोज वॉकच्या  वेळेत बरेच ओळखीचे, अनोळखी, काही एकटे तर काही  ग्रुप करून चालणारे वॉकर्स आजूबाजूला  दिसत असतात. आपापल्या विचारामध्ये मग्न राहून चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीस करावे कधीतरी   उत्साहपूर्वक, दिलसे  'गुड मॉर्निंगss' किंवा 'सुप्रभातss'  असे  अभिवादन !! नकळत दोघांच्याही मनात ऊर्जा भरून जाते. चेहेऱ्यावर क्षण-दोन क्षणांसाठी हास्य फुलविते ! आम्हीही रोज अशाच एका वयोवृद्ध जोडप्याला रोज बघायचो. त्यातल्या आजी, आजारी दिसणाऱ्या आजोबांना हाताने आधार देत चालवीत असायच्या. त्या आजोबांच्या फिरणाच्या उत्साहाला एक दोनदा 'भारी आजोबा' किंवा 'आज प्रगती आहे बरं का आजोबा ' अशी मनःपूर्वक दाद दिल्यावर, आता ते आजोबा रोज स्वतःहूनच हसून, हात हलवून अभिवादन करायला लागले आहेत.  दिवसभरात कधीही उदासी किंवा नैराश्येचे क्षण आले, तरी मला त्या आजोबांचा हसरा चेहरा आठवतो आणि  त्यांची आजारपणावर मात करण्याची विजिगिषु वृत्ती मनात चैतन्य भरण्यास मदत करते.

अशीच ऊर्जा मनात भरतात  ते उत्साही व्यायामपटू.  आजचे  'वर्कआउट समिट' गाठण्याचा प्रयत्नात एकाग्र होऊन घाम गाळताना रनर्स  किंवा सायकलिस्ट आजूबाजूस दिसत असतात. त्यांना समोर बघून, अवास्तव भीड मनात न बाळगता खिलाडूवृत्तीने  द्यावा  जरा उत्स्फुर्तपणे समोरच्याला एक लाईकचा अंगठा किंवा म्हणावे 'ग्रेट गोईंगss  ' ! असे करून कोणाचाही उत्साह वाढविल्यावर  त्यांचाही  व्यायामाचा जोम  तर वाढतोच शिवाय त्यांनी हसून आपल्याला दिलेल्या स्माईलमुळे आपल्यालाही ऊर्जा मिळते. त्यांच्यासारख्या आरोग्यवर्धक मार्गाने जाणायची प्रेरणा मिळते.   बस, आपण ओपन-अप होऊन दाद देण्याची वृत्ती जोपासायला हवी.     

नाक-कान-डोळे व्यवस्थितपणे उघडे ठवून चालल्यास निसर्गही आपल्या वेगवेगळ्या रूपांनी आपल्याला संजीवनी देतांना आपण अनुभवू शकतो.  जस्ट  ओपन देम ! कुठल्याही ऋतूत, विविध रंगी पाने-फुले-फळे  यांचे वैभव मिरविणारी झाडे, त्यावर बागडणारे विविध आवाजांचे  पक्षी यांकडे लक्ष्य जाण्यासाठी, मनातील रुटीन विचार झटकून , मनाची कवाडे उघडी ठेवायला हवीत. असे केल्यावर निसर्गाची ही रूपे मनात घर करून  रहातात. आम्हाला रोज एका झाडावर भारद्वाज दिसायचा. एके  दिवशी त्याचे नुकतेच उडायला लागलेले पिल्लूही त्याच्याबरोबर दिसल्यावर मन आनंदाने भरून गेले. एकदा एका  बंगल्याच्या आवारातील बागेत वेड्यासारखा फुललेल्या,  गुलाबी चाफा आणि सोनचाफा यांच्या एकत्रित सुगंधाने, मनाला एका नवीनच सुगंधी मखरात नेवून बसविले. कधी कोणा वॉकरच्या खिशातून ऐकू आलेली भन्नाट सुरावट, दिवसभर आपल्या मनात घुमत रहाते.

नाक-कान-डोळ्यांबरोबरच मनाची दारेही उघडी ठेवून, आपली ऊर्जा वाढविणारे हे रसग्रहण करायला  काय हरकत आहे? पण चित्र बरेचदा वेगळेच दिसते दिसते.  मोबाईल ऍप्पवर आपला आजचा वर्कआउट झळकवेपर्यंत  इतर कोणाकडे ढुंकूनही बघाण्याची फुरसत नसलेल्यांच्या, घरगुती गॉसिपमध्ये  किंवा विनाकारण गंभीरपणे, जमिनीकडे बघत रोजचा वॉक संपविणाऱ्यांच्या  बंद मनांना अशी चैतन्यदायी अनुभूती कशी बरी येणार? तेव्हा व्हा ओपन अप, रहा  ओपन अप !! दिलखुलासपणे दाद द्या, उत्साही  आवाजात अभिवादन करा, पॉझिटीव्ह उर्जेचे आदान-प्रदान करा, मन प्रयत्नपूर्वक जागृत ठेवून निसर्ग अनुभवा!! आपल्याच आजूबाजूस  कितीतरी अनामिक उर्जास्त्रोत वावरत असतात. खुल्या मनाने ती उर्जा भरभरून घेतल्यास प्रत्येक दिवसच 'ओ.पी. नय्यर' यांच्या गीतांसारखा हलका-फुलका ,उडत्या चालीचा नकीच होईल !! ओपन अप !!!


2 comments: