Tuesday, June 1, 2021

गरज ..कौटुंबिक अर्थ साक्षरतेची !!

 


गरज ..कौटुंबिक अर्थ साक्षरतेची !!

कोविडच्या या दुसऱ्या त्सुनामीत अनेक कुटुंबांमध्ये  घरातील कर्ता  किंवा कुटुंबातील मिळकत असणारा व्यक्ती  यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या कठिण कालावधीत त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी जेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष किंवा फोनवर संवाद साधला तेव्हा असे लक्षात आले की परिवारातील इतर सदस्यांना, मृत झालेल्या व्यक्तीच्या नावे असणाऱ्या मालमत्ते विषयी, त्याने केलेल्या आर्थिक व्यवहारांविषयी  फारच जुजबी माहिती होती. त्याचाच परिणाम म्हणुन, मिळवित्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्य आर्थिकदृष्टया हतबल झालेले दिसले !

पण अशा आजूबाजूला घडणाऱ्या अनेक प्रसंगांमुळे, आपल्या कुटुंबियांना वेळीच अर्थ साक्षर करणेसाठीचे, घरातील आर्थिक निर्णयांबद्दल, व्यवहारांबद्दल त्यांना माहिती देण्याचे महत्व उद्धृत झालेले आहे ! या कालावधीत  त्यांना मानसिक आधार देण्या व्यतिरिक्त ज्या काही व्यावहारिक गोष्टी करणे  क्रमप्राप्त  होते ते करतांना अशा समदुःखी  इतर परिवारांसाठीही उपयुक्त ठरेल अशी चेकलिस्ट बनविता येईल का असा विचार केला आणि पुढीलप्रमाणे काही मुद्दे तयार केले.  ज्यांच्या घरामध्ये कुटुंबातील सदस्याचा मृत्यू ओढवलेला आहे, त्यांनी पुढील काही बाबी तपासून  पाहाव्यात आणि इतरांनी त्याबाबतीत वेळीच सजग व्हावे !

जीवन तसेच आरोग्य वीमा:  सर्वप्रथम दिवंगत सदस्याचा जीवन विमा काढलेला आहे का हे पहा . जीवन विमा एक किंवा अधिक संस्थांमध्ये काढलेला असू शकतो ही  शक्यता तपासून पहा. काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा तसेच जीवन विमा काढलेला असतो.  त्याद्वारे सुद्धा  कुटुंबियांना लाभ मिळू शकतो.  तसेच या सदस्याच्या बँक अकाउंट मधून  पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा  हप्ता  जर  वर्ग  झाला असेल  तर त्या योजने अंतर्गतही रुपये दोन लाख इतका लाभ कुटुंबियांना मिळू शकतो.  दिवंगत सदस्याचा मृत्यू जर उपचार घेताना इस्पितळात झालेला असेल तर आरोग्य विमा लाभ देखील उपलब्ध होऊ शकतो.  तेव्हा सदस्याच्या जीवन तसेच आरोग्य विमा पॉलीसी  पडताळून पहा. याबाबतीत योग्य वेळेत मृत्यूचा दाखला आणि लागू असल्यास इस्पितळाची सर्व  बिले सादर करावी लागतात.

कर्मचारी सुविधा:  दिवंगत व्यक्ती कार्यरत असणाऱ्या कंपनीमध्ये भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, बोनस, पेन्शन,  गेल्या महिन्याचा  पगार, जमलेल्या रजांचा पगार, ग्रुप वीमा, सोसायटी लाभ असे  अन्य काही लाभ कंपनी देत असल्यास ते पडताळून पहा.  त्यासाठी आवश्यक असणार्या कागदपत्रांची पूर्तता करा.   

बँक खाते अथवा मुदत ठेवी: दिवंगत सदस्याच्या नावाने किती ठिकाणी बँक/ मुदत ठेव  खाती होती आणि त्याची  कागदपत्रे जसे पासबुक, चेकबुक, बँकेची स्टेटमेंट तपासून पहा.  संबंधित बँकांमध्ये जाऊन मृत्यूचा दाखला तसेच नामांकन असणाऱ्या व्यक्तीचे इतर कागदपत्रे सादर करा. अशा व्यक्तीचा मोबाईल तपासून पाहिल्यास एस. एम. एस. द्वारे आलेले बँकेचे स्टेटमेंट किंवा मोबाईल मध्ये असणारे बँक ॲप्लिकेशन याद्वारेही माहिती प्राप्त करून घेता येऊ शकते.

इतर गुंतवणूक:  दिवंगत व्यक्तीच्या नावाने म्युच्युअल फंड, शेअर्स, पोस्टातील, खाती स्थावर मालमत्ता इत्यादी ठिकाणी गुंतवणूक असल्यास त्या संबंधित कागदपत्रे तपासून पाहता येतील.  परिवाराशी संबंधित अर्थ सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंटंट आपल्याला पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक कागदपत्रे/ स्टेटमेंट्स काढून  देऊ शकतात. अशा व्यक्तीच्या नावे जर कुठे लॉकर सुविधा घेतलेली  असेल तर तेथेही बचत अथवा गुंतवणुकीचा ऐवज किंवा कागदपत्रे ठेवलेली असू शकतात याचीही नोंद घ्या.

खर्च/ दायित्वे: दिवंगत सदस्यांच्या नावे काही कर्ज घेतलेले असल्यास त्याचे हप्ते कुठल्या बँक खात्यांमधून  वर्ग होत आहेत  हे तपासून घ्या. बँक खात्यांमधून वेगवेगळे हप्ते जसे गृहकर्ज, वाहनकर्ज,  विमा हफ्ते , म्युच्युअल फंडातील एस.आय.पी. इत्यादी वर्ग होऊ शकतात. त्याची वेळेवर दखल घ्या. दिवंगत सदस्य जर प्राप्तीकर भरत असेल तर प्राप्तिकराची  कागदपत्रे तपासून पहा.  काही ठिकाणी टी.डी.एस. वर्ग केलेला असू शकतो त्याविषयी  माहिती जाणून घ्या.

कोरोना कालावधीत ओढवलेल्या या  परिस्थितीत, 'अर्थ साक्षर परिवार ' असणे, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे इच्छापत्र असणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते आहे. घरातील प्रत्येक मिळवित्या सदस्याने, कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या सर्व आर्थिक बाबींचे  नोंदनीकरण करणे, घरातील सर्व सदस्यांना केलेल्या आर्थिक व्यवहारांविषयी तसेच तरतुदींविषयी माहिती देणे आणि त्यायोगे त्यांना अर्थ साक्षर करणे गरजेचे आहे . असे केल्याने एखाद्या कुटुंबाची वास्तविक, आर्थिक परिस्थिती आणि त्यायोगे असणारी आपली जबाबदारी याचे भान  सर्व सदस्यांना  स्पष्ट होण्यास मदत होते. कोरोना कालावधीत आजुबाजुला घडणारे  प्रसंग डोळसपणे पाहुयात आणि  आपल्या कुटुंबियांना आपल्या घरातील आर्थिक घडमोडींची पूर्ण माहिती, देऊयात.

तुमच्या आणि परिवाराच्या आरोग्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा !! भवतु सब्ब मंगलम् !!

No comments:

Post a Comment