Menu

Thursday, July 15, 2021

थरार @ दुगारवाडीचा

 


हा अनुभव  आहे  १५ ऑगस्ट  १९९८ म्हणजे जवळपास  २० वर्षां पूर्वीचा !!  ताईचे  लग्न  ठरले  होते आणि पत्रिकावाटपा साठी  आई-बाबा  मुंबईला गेले होते ! तेव्हा घरात  मी आणि ताई असे दोघेच होतो. सकाळची  १० ची वेळ.  सुट्टीच्या  दिवशी , घरात आरामात  लोळत पडावे अशा विचारात असतानाच माझे दोन (उपटसुम्भ) मित्र  घरी प्रकटले . त्यांचा   मात्र पावसाळी भटकंतीचा मुड  होता  आणि आम्हाला  न्यायलाच   (म्हणजे घरातून उचलायलाच  ) ते उगवले  होते. मग जायचे  की  नाही , कुठे  जायचे , कसे आणि किती वाजता निघायचे असे  चर्चाचर्वण सुरु झाले. त्यात , ताईकडे  चहा  आणि पोह्याची  फर्माईश झाली. झाले !! चहा पाणी आणि चर्चा  यामध्येच दुपारचे १२ वाजले आणि दुगारवाडीला जाण्यावर आमचे शिक्कामोर्तब झाले.  संध्याकाळ पर्यन्त आई बाबा परतणार होते  आणि  रात्री आम्हा  चौघांना एके ठिकाणी  केळवणालाही जायचे  होते म्हणून कुठल्याही परिस्थितीत ७ पर्यंत परतायचे  असा सुनिश्चय करून , आपापल्या  दुचाकींवर  टांगा टाकून आम्ही  घरातून बाहेर पडलो .

           जुन -जुलै त  झालेल्या दमदार पावसाने , त्र्यंबकरोड कसा मस्त , हिरवाकंच झालेला होता.  त्या ओल्या हिरवाईला नजरेत साठवत आम्ही दुगारवाडी फाट्या पर्यंत येऊन पोहोचलो. गावातच दुचाकी लावल्या आणि कधी शेतांमधून तर कधी रानातून चिखल तुडवीत आम्ही धबधब्याच्या दिशेने निघालो. पाऊस अगदीच तुरळक पडत होता आणि कडेवरुन धबधब्याच्या धारेचे विहंगम दृश्य दिसत होते. ते दृश्य पाहून आम्हाला जे स्फुरण चढले की भरभर उतरण पार करून, आम्ही ओढा  पार करून, धबधब्याखालील दगडांवर  येऊन विसावलो. मग  ते दृश्य पाहत, खादाडी आणि गप्पांमध्ये रमून गेलो . दोन तास गेले असतील आणि अचानकच आकाश खूप काळोखून आले. दुपारच्या तीनलाच रात्री प्रमाणेच  अंधार दाटून आला होता. आणि क्षणार्धातच धुवाधार पावसाला  सुरुवात झाली. पावसाचे वेगाने येणारे थेंब, अंगाला सुईप्रमाणे टोचत होते . बरोबरचे  पर्यटक लगोलग निघत  असल्याचे दिसत असूनही आम्ही पाऊस कमी व्हायची वाट पाहत, किनाऱ्याला झाडांच्या आडोश्याने उभे राहिलो.  तिथेच आमची घोडचूक झाली.  पाऊस तर काही कमी होण्याचे नाव घेत नव्हता आणि धबधब्याची पातळ धार आता चांगलीच रौद्र रूप घेऊन खाली झेपावत होती. तास असाच गेला असेल. आता आम्ही तसेच परतायचा निर्णय घेतला.  मघाशी आम्ही ज्या ओढ्यातून, पोटरी इतक्या पाण्यातून चालत आले होतो तिथे आता कमरेइतक्या उंचीचा  , दमदार पाण्याचा प्रवाह तयार झाला होता. तो  पार करणे म्हणजे  जीवावर उदार होण्यासारखे होते. आता आम्ही   तिघे मित्र  एकमेकांना शिव्याशाप देत , कोणामुळे उशीर झाला ह्या निर्रथर्क चर्चा करीत  बसलो.  ताई तर बिचारीआता कसे आणि किती वाजता घरी जाऊ शकू आणि गेल्यावर आई-बाबांना कसे सामोरे जायचेया विचारांनी चिंतेत पडली होती . शेवटी भानावर येत आम्ही वहिवाटे ऐवजी, आहे त्याच बाजूने, वर कड्याच्या दिशेने जाण्याचे ठरविले. आणि अंधाऱ्या , अनोळखी वाटेवरून, एकमेकांचा हात धरून आम्ही सर्व त्या जोरदार पावसात, काट्याकुट्यांतून ती अतिशय , घसरट चढण कशीबशी पार केली.  उलट दिशेने आणि  भरपूर पायपीट करून आम्ही जेव्हा गावात पोहोचलो तेव्हा सात वाजून गेले  होते.   घरी पोहोचेपर्यन्त आई-बाबा आपल्याआधीच आले असतील का, केळवण करणाऱ्या यजमानांकडून फोन आले असतील का या काळजीने आम्ही इतके त्रस्त झालो होतो की केवढे जीवावरचे संकट पार करून आलो होतो त्याचे भानच राहिले नाही आणि आम्ही घराच्या दिशेने गाड्या अक्षरशः पळविल्या.   

       घरी पोहोचलो आणि फ्रेश होईपर्यत आई बाबा ही पोहोचले. काही झालेच नाही अशा अविर्भावात तयार होऊन, साळसूदपणे केळवणाला गेलो आणि तिकडे जेवणावर मस्त  आडवा हात मारला.  घरी येऊन सावकाशीने आई-बाबांना सर्व किस्सा सांगितला आणि झालेल्या  प्रकाराचे खापर (अनुपस्थित ) मित्रांवर फोडले. त्या नंतर घरात जे व्हायचे होते ते तर झालेच  शिवाय पंधरा दिवस मी तापाने फणफणलो. ऐन  लग्नसराईत मदती ऐवजी, आडवा पडून सर्वाना "पलांगोपदेश" करत राहिलो. (हं , एक  फायदा मात्र झाला की , त्या पंधरा दिवसात "जवळची", काही "खासम खास" मंडळी, दोन -चार वेळा येऊन मला भेटून गेली.)

          आजही मी आणि ताई जेव्हा जुने फोटो काढून बसतो तेव्हा माहेरची  तिची ही शेवटची ट्रिप कशी "यादगार" झाली ते आठवतो.  ( आणि मी पुन्हा त्या  दोन मित्रांचा शाब्दिक उद्धार करतो ). पण त्यापुढच्या सर्व  ट्रिप्स ना वेळेचे आणि निसर्गरूपाचे भान मात्र ठेवायला शिकलो आहे. 

 

- अनुभव: श्री. दीपक  कुलकर्णी , नासिक . 

 शब्दांकन : डॉ. रुपाली कुलकर्णी (हो !! तीच ती  "खासम खास" मंडळी बर  का !! )

No comments:

Post a Comment